आ. शशिकांत शिंदे; आ. शिवेंद्रराजेंच्या टीकेला प्रत्युत्तर
सातारा, दि. 4 (प्रतिनिधी) –
आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कुडाळ, ता. जावळी येथील एका कार्यक्रमात बोलताना, मी संपलो तरी चालेल, पण समोरच्याला संपवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा आ. शशिकांत शिंदे यांचे नाव न घेता त्यांच्या होमपिचवर दिला होता.
त्याला आ. शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. माझा शिवेंद्रराजेंशी वैयक्तिक वाद नसून, मी पक्षवाढीसाठी काम करत आहे. हे काम करताना संघर्ष करावा लागला तरी चालेल, असे आ. शशिकांत शिंदे यांनी सुनावले. नवी मुंबईत एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रयेमुळे सातारच्या राजकारणात पुढे काय घडणार, याचे उत्सुकता सर्वांना आहे.
छत्रपती घराण्यात संघर्ष नको म्हणून आम्ही दोन भावांनी जुळवून घेतले आहे. राजकारणात संघर्ष मला नवा नाही; पण माझा काटा काढण्याकरिता कोणी मला टार्गेट करत असेल, तर मी अभयसिंहराजेचा सुपुत्र आहे, हे लक्षात ठेवावे. राजकारणात मीही काट्याने काटा काढणार, असा रुद्रावतार आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी कुडाळ येथे शेतकरी मेळाव्यात धारण केला होता.
संयमी नेतृत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आ. शिवेंद्रराजे यांचा कुडाळ येथील “अँग्री यंग मॅन’चा डायलॉग चर्चेचा विषय झाला आहे. मी कोणालाही दगाफटका केला नाही; पण कोणी माझ्यावर संघर्ष लादायचा प्रयत्न करत असेल, तर मीही त्याला पुरून उरेन, असा इशारा शिवेंद्रराजेंनी दिला होता.
या वादाच्या मुळाशी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे वाजणारे पडघम असतील, अशी चर्चा सुरू असून, त्यावर आ. शशिकांत शिंदे हे काय बोलणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष होते.
आ. शिंदे यांनी नवी मुंबईत एका वृत्तवाहिनीशी बोलताना आ. शिवेंद्रराजेंना चोख प्रत्युत्तर दिले. त्यांच्या आणि माझा वैयक्तिक वाद नसला, तरी ते आज भाजपमध्ये आहेत. सातारा-जावळी मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाढीसाठी प्रयत्न करण्याचे आदेश मला पक्षनेत्यांनी दिले आहेत.
त्यामुळे मी कार्यकर्त्यांना भेटत असेन, तर त्यात गैर काय? विधानसभा निवडणुकीत सातारा-जावळीतून लढण्याची सूचना मला होती; परंतु माझ्या मनात खोट नसल्याने मी कोरेगावमधूनच लढलो.
आता पक्षवाढीसाठी काम करायचे असून, त्यासाठी संघर्ष करायची माझी तयारी आहे, असे ते म्हणाले.