न्युयॉर्क : संयुक्तराष्ट्रांच्या आम सभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी न्युयॉर्क मध्ये दाखल झाले असून आज त्यांनी विविध राष्ट्रप्रमुखांशी तेथे भेट घेतली. त्यात जर्मनीच्या चान्सलर अँजेला मार्केल, इटालिचे पंतप्रधान गुसिप्पे कोंते, कतारचे अमिर शेख तामिम बिन हमाद, यांचा समावेश होता.
पंतप्रधान न्युयॉर्क मध्ये शनिवारी रात्री दाखल झाले. त्यानंतर त्यांनी संयुक्तराष्ट्रांच्या आमसभेसाठी आलेल्या विविध राष्ट्रप्रमुखांशी भेटी गाठी घेतल्या. कोलंबियाचे अध्यक्ष इव्हान डक मार्केज, नायजेरीचे अध्यक्ष महामदोऊ,नामिबीयाचे अध्यक्ष हेग जिंगोब, मालदीवचे अध्यक्ष इब्राहीम सोलिह, भूतानचे पंतप्रधान लोटे त्शेरींग, आणि नेदरलॅंडचे पंतप्रधान मार्क रूटे यांच्याही त्यांनी भेटी घेतल्या. त्यांनी इटालिच्या पंतप्रधानांशी संरक्षण क्षेत्रातील सहकार्य आणि गुंतवणूक विषयक बाबींवर चर्चा केली.
भारत आणि इटाली यांच्यातील सांस्कृतिक संबंध दृढ करण्यासाठी आणि परस्परांमधील व्यापार अधिक वृद्धींगत करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे मोदींनी ट्विटरवर म्हटले आहे. कतारच्या अमिरांनी पंतप्रधान मोदींनी योग जभगरात लोकप्रिय करण्याबाबत जे योगदान दिले त्याविषयी त्यांचे विशेष आभार मानले आहेत. मालदीवच्या अध्यक्षांनी त्यांच्याशी वातावरणातील बदलांचा सामना करण्यासाठी परस्परांमधील सहकार्य वृद्धींगत करण्याविषयी चर्चा केली. मोदींनी संयुक्तराष्ट्रांच्या युनिसेफ संस्थेचे संचालक हेन्रीत्ता फोरे यांच्याशी भारतातील मुलांचे आरोग्य आणि पोषण याविषयी त्यांनी माहिती दिली.