नाशिक : पंकजा मुंडे यांनी भगवानगडावरील महाप्रसादाचे ताट नाकारले, असे वक्तव्य भगवानगडाचे मठाधिपती नामदेवशास्त्री यांनी केले आहे. जे ताट पंकजा मुंडेंनी नाकारले, ते त्यांचे चुलत बंधू धनंजय मुंडेंनी स्वीकारले, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नाशिक येथे आयोजीत कार्यक्रमावेळी एका वृत्त वाहिनीशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. नामदेवशास्त्री म्हणाले, भगवानगडावरील महाप्रसादाचे ताट पूर्वी दिवंगत गोपीनाथ मुंडे स्वीकारत होते. त्यानंतर पंकजा मुंडे ते ताट स्वीकारत होत्या. परंतु आता तेच ताट त्यांनी नाकारले. ते ताट धनंजय मुंडेंनी स्वीकारले. कारण त्यांच्या रक्तातच भगवान बाबांची भक्ती आहे. नाकारलेला महाप्रसाद धनंजय मुंडेंना मिळाला.
गेल्या काही वर्षात धनंजय मुंडेंनी अनेक अपमान पचवले आहेत. धनंजय मुंडे यांच्यात प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे आणि शरद पवार या तिघांचे गुण आहेत. त्यामुळेच त्यांना राजकारणात यश मिळत आहे. दरम्यान, भगवान गडावर कोणत्याही प्रकारचे राजकीय भाषण होणार नाही, हे नामदेव शास्त्री यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.
दरम्यान, दोन वर्षांपूर्वी भगवान गडावर राजकीय कार्यक्रम (दसरा मेळाव्यातील भाषण) करण्यासाठी पंकजा मुंडे यांनी भगवानगडाचे मठाधिपती नामदेवशास्त्री यांच्याकडे परवानगी मागितली होती. परंतु नामदेव शास्त्रींनी परवानगी देण्यास नकार दिला. त्यावेळी पहिल्यांदाच नामदेव शास्त्री आणि पंकजा मुंडे आमने-सामने आले होते.