न्यूयॉर्क – पृथ्वीव्यतिरिक्त आता अंतराळातील भाज्या पिकविल्या जात आहेत. नासाच्या संशोधकांनी अलिकडेच अंतराळात भाजीचे रोप उगविले आहे. लेटयुस अशा या भाजीचे नाव असून त्याचा सॅलड तसेच बर्गरमध्ये वापर केला जातो. अंतराळात उगविलेले लेटयुस पृथ्वीवरील लेटयुसपेक्षा अधिक पौष्टिक असल्याचा दावा नासाच्या वैज्ञानिकांनी केला आहे.
यासंबंधी प्रंटीयर्स इन प्लांट सायन्स जर्नलमध्ये एक वैज्ञानिक अध्ययन प्रकाशित करण्यात आले आहे. नासाने पृथ्वी तसेच अंतराळात उगविल्या जाणाऱया भाज्यांमधील फरक या लेखात मांडला आहे. अंतराळात उगविण्यात आलेले लेटयुस हे पृथ्वीवरील लेटयुसशी मिळतेजुळते दिसून येते. पण अंतराळात उगविल्या जाणाऱया अनेक रोपांमध्ये पृथ्वीच्या तुलनेत पोटॅशियम, सोडियम, झिंक इत्यादी पोषक घटक अधिक प्रमाणात आढळून आले आहेत.
नासाच्या अंतराळवीरांनी ही भाजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर सेरामिक मृदा तसेच रेड लायटिंगयुक्त बंद बॉक्समध्ये उगविली आहे. इंजेक्शनद्वारे या रोपांना पाणी दिले जात होते. तसेच रोपाची पूर्ण लागवड होण्यास 33 ते 56 दिवसांचा कालावधी लागला आहे. या भाजीचा अंतराळवीरांनी आस्वाद घेतला असून काही प्रमाणात भाजी डीप फ्रीजरमध्ये ठेवून पृथ्वीवर आणली गेली आहे.
अंतराळातील लेटयुस पृथ्वीवर आणल्यावर त्यात मोठया संख्येत बॅक्टिरिया असल्याचे आढळून आले आहे. अंतराळात रोपांची लागवड दीर्घकालीन मोहिमांसाठी उपयुक्त ठरणार आहे. या संशोधनामुळे अंतराळवीर पाकीटबंद खाद्यपदार्थांच्या व्यतिरिक्त तेथे भाज्या उगवून त्याचा आहारात समावेश करू शकतील.