नारायणगाव-येथे पुणे-नाशिक महार्गावरील बाह्यवळणावर एका सहा वर्षीय नर बिबट्याला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना आज (शुक्रवारी) पहाटेच्या सुमारास घडली. नारायणगावातील वालझाडे मळ्याजवळील नवीन बाह्य वळणावर आज पहाटेच्या सुमारास एका बिबट्या रस्त्याच्या कडेला मृत्यूमुखी पडल्याची माहिती वनविभागाला कळाली. वनविभागाचे वनपाल कृष्णा दिघे, मनीषा काळे, मडके, वनरक्षक खरमाळे यांनी मृत बिबट्याला ताब्यात घेऊन माणिकडोह निवारण केंद्रात नेले. बिबट्याचे शव विच्छेदन पशूधन विकास अधिकारी डॉ. शशिकांत डुंबरे यांनी केले व सहायक वनसंरक्षक एम. पी. भावसार यांनी भेट दिली. बिबट्याचे दहन केले.