सहाजणांचा समावेश : लोणीकंदमध्ये डंपरच्या बॅटऱ्या चोरल्या
वाघोली- चारचाकी गाडीच्या नंबर प्लेटला चिखल लावून चोरी करणाऱ्या सहाजणांच्या टोळीला लोणीकंद पोलिसांनी पेट्रोलिंग करताना पकडले. टोळीमध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश असून लोणीकंद येथील दोन डंपरच्या बॅटऱ्या चोरल्याची कबुली त्यांनी दिली आहे. सद्दाम दौला पटवारी, जुबेर हामीद पटवारी, आमिर युसूफ पटवारी, शाहरुख शकील अन्सारी, मंगेश विलास दुधभाते (सर्व रा. हडपसर, पुणे), असे अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी सहा आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
लोणीकंद पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी लोणीकंद गावच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. लोणीकंद – थेऊर रोडवर खंडोबा माळ येथे रोडच्या कडेला पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर दिसली. डिझायरच्या नंबरप्लेटला चिखल लावला असल्याने पोलिसांनी तात्काळ गाडीतील संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे विचारपूस केली असता समाधानकारक उत्तरे मिळाली नाही. सर्वांना पोलीस ठाण्यात आणून कसून चौकशी केली. त्यावेळी चौकशीमध्ये सहाजणांनी तुळापूर फाटा येथे दोन डंपरच्या बॅटऱ्या चोरल्याचे कबूल केले. त्यांच्याकडील डिझायर गाडी जप्त केली आहे. त्यांच्याकडून इतरही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सर्वजण मूळचे लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्याचे असून हडपसर परिसरात राहून रात्रीच्यावेळी फिरून लुटमारी करीत होते. पोलीस निरीक्षक डी. एस. हाके, सुरेशकुमार राऊत (गुन्हे) यांनी गुन्हे शोध पथकाच्या मदतीने सर्वांना अटक केली. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे, पोलीस हवालदार बाळासाहेब सकाटे, संतोष कुलथे, समीर पिलाणे, ऋषीकेश व्यवहारे, प्रफुल्ल सुतार यांनी केली आहे.