नवी दिल्ली : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्याबद्दलचा सहकारी खेळाडूंचा आदर आजही कायम असल्याचे दिसून आले आहे. धोनीचे मनातीलच नव्हे तर संघाच्या बसमधील स्थान आजही कायम असल्याचा गौप्यस्फोट यजुर्वेंद्र चहलने केला.
संघ जेव्हा जेव्हा प्रवास करतो त्यावेळी बसमध्ये धोनी ज्या आसनावर बसत असे ते आसन आजही रिकामेच ठेवले जाते. चहलला धोनीच्या शेजारी बसण्याचे भाग्य लाभले असून त्यानेच एक व्हिडीओ पोस्ट केला असून शेजारी धोनीची सीट रिकामी असल्याचेही दिसत आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अधिकृत ट्विटर हॅंडलवर चहलने एक व्हिडीओ पोस्ट केला असून त्याला असंख्य चाहत्यांनी लाईक केले आहे. या व्हिडीओमध्ये भारतीय संघ बसमधून ऑकलंडहून हेमिल्टनला जात असल्याचे दिसत असून त्यात चहलच्या शेजारील धोनीचे सीट रिकामी ठेवल्याचेही दिसत आहे.
या व्हिडीओमध्ये धोनीच्या सीटकडे इशारा करत येथेच महान क्रिकेटपटू धोनी बसत असे, सध्या तो संघात नसला तरीही या सीटवर कोणीही बसत नाही. आम्ही त्याला खूप मिस करतो, असेही चहलने सांगितले आहे.
इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वकरंडक क्रिकेट
स्पर्धेतील न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य लढतीनंतर धोनी आतापर्यंत एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. त्याच्या निवृत्तीवरून खूप चर्चा रंगत आहेत, मात्र त्याने अद्याप आपला निर्णय जाहीर केलेला नाही. संघातून
बाहेर असला तरी त्याच्याबद्दलचा आदर आजही कायम
असल्याचेच चहलच्या व्हिडीओतून स्पष्ट होत आहे.