टेळेवाडी येथे भूषणसिंहराजे होळकर यांचे प्रतिपादन
नांदूर – धनगर समाजाच्या आरक्षणासाठी न्यायालयीन लढा सुरूच ठेवू; पण वेळप्रसंगी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली तरी आता समाजाने मागे पुढे पाहू नये. आरक्षणासाठी धनगर समाज बांधवांनी मतभेद विसरून एकत्र यावे. असे आवाहन होळकर राजघराण्याचे भूषणसिंहराजे होळकर यांनी केले. टेळेवाडी (ता. दौंड) येथे महागणपती करिअर फाऊंडेशन आणि टेळेवाडी राहू बेट परिसराच्या वतीने विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान व्यक्तींच्या गुणगौरव समांरभाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी राजे होळकर बोलत होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते अहल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. दरम्यान स्नेहल धायगुडे (जिल्हा अधिकारी), योगेश कुलाळ (वनविभाग), विक्रम वीरकर (महसूल विभाग), बापूसाहेब दडस (पोलीस उपअधीक्षक) या प्रशासकीय सेवेतील अधिकारी, तसेच मल्हारी मलगुंडे (औद्योगिक क्षेत्र), दिलीप हंडाळ आणि घनश्याम हाके (सामाजिक श्रेत्र), ऍड. दौलत ठोंबरे (शिक्षण), प्रा. संतोष काळे (पत्रकारिता), गोरक्ष डुबे (काला व साहित्य), साक्षी म्हस्के व आबासाहेब शेंडगे (क्रीडा क्षेत्र) यांना सन्मान चिन्ह आणि प्रशस्ती पत्रक देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र टेळे यांनी केले. सूत्रसंचालन संतोष टेळे यांनी केले, तर अतुल टेळे यांनी आभार मानले.