देहुरोड – रावेत येथून रावण टोळीतील एकास 2 जिवंत काडतूस आणि कट्यासह देहुरोड पोलीस ठाण्याच्या स्थानिक गुन्हे प्रकटीकरण पोलीसांनी अटक केले. वडगाव न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सागर मलकारसिद्ध परीट (वय 23, रा. श्री स्वप्नपूर्ती, बी. फ्लॅट नंबर 702, घरकुल, चिखली) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहुरोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरणातील पोलीस शिपाई सचिन शेजाळ याला बातमीदारामार्फत माहिती मिळाली. त्यानंतर देहुरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिष कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरणाचे सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद गज्जेवार यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक अशोक जगताप, पोलीस नाईक प्रमोद उगले, प्रशांत पवार, मयूर जगदाळे, पोलीस शिपाई विकी खोमणे, संकेत घारे, किशोर परदेशी, विजय गेंगजे, सचिन शेजाळ, सुमित मोरे आदींनी रावेत येथील अप्पुघर मागील बीआरटी मार्गावर सापळा रचला.
संशयित सागर हा रावण गॅंगचा असल्याचे माहिती मिळाली. त्याला ताब्यात घेत त्याच्याकडून दोन जिवंत काडतुसे व एक गावठी कट्टा असल्याची कबुली मिळाल्यावर त्याला सोमवारी (दि. 27) अटक केले. वडगाव न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी सहायक पोलीस ठाण्याचे स्थानिक गुन्हे प्रकटीकरणाचे सहायक पोलीस निरीक्षक गज्जेवार तपास करीत आहेत.