सातारा – येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात दि. 22 मे रोजी दाखल झालेल्या अंदोरी, ता. खंडाळा येथील 43 वर्षांच्या (सारीचा रुग्ण) कोव्हिडबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. रांजणी, ता. जावळी येथे मुंबईतून आलेल्या 85 वर्षांच्या महिलेचा रिपोर्ट काल (दि. 1) रात्री पॉझिटिव्ह आला होता. या महिलेचाही मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी मंगळवारी दिली. करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता 23 झाली आहे.
अंदोरी येथील 43 वर्षांच्या रुग्णामध्ये “सारी’ची लक्षणे आढळली होती. त्याचा करोना अहवालही पॉझिटिव्ह आला होता. दरम्यान, हडपसर (पुणे) येथून प्रवास करुन आलेला 27 वर्षांचा युवक व मुंबईतून प्रवास करून वेळेकामथी, ता. सातारा येथे आलेल्या 59 वर्षांचा पुरुष यांचा मृत्यू झाला. त्यांच्या घशातील स्रावांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आल्याचेही डॉ. गडीकर यांनी सांगितले. जिल्ह्यात आतापर्यंत 556 बाधित रुग्ण आढळले असून 223 रुग्ण बरे झाले आहेत. 310 रुग्णांवर उपचार सुरू असून 23 जणांचा मृत्यू झाला आहे.