दोन ट्रिलियन महसूल गोळा करण्याचे लक्ष्य
नवी दिल्ली : नोटाबंदीच्या काळात सोन्याच्या दागिन्यांची विक्री करणाऱ्या ज्वेलर्सना आयकर विभागाने नोटीस बजावलेल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2016 मध्ये नोटाबंदी जाहीर करत 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून रद्द केल्या होत्या. यानंतर अनेकांनी ज्वेलर्सकडे धाव घेत सोन्याच्या दागिन्यांची खरेदी केली होती. याच पार्श्वभुमीवर आयकर विभागाकडून ज्वेलर्सना नोटीस पाठवण्यात आली आहे.
काळा पैसा बाहेर यावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा चलनातून रद्द केल्या होत्या. यानंतर अनेकांनी काळा पैसा लपवण्यासाठी सोन्याची खरेदी करत पैसे गुंतवले होते. आपले फक्त आडनाव जाहीर करण्याच्या अटीवर जैन या व्यापाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आपण आपला सर्व स्टॉक एका दिवसात विकला होता. दोन आठवड्यात जितकी कमाई होते तितका महसूल एका दिवसात जमला होता.
तीन महिन्यांपूर्वी अचानक त्यांना आयकर विभागाची नोटीस आली. या नोटीसमध्ये त्यांना आपल्या कमाईचा मार्ग, तसेच त्या रात्री जमा झालेला सर्व महसूल जमा करण्याचा आदेश देण्यात आला आहे. या व्यवहारात काळा पैसा असल्याचा संशय असल्यानेच आयकर विभागाकडून ही नोटीस पाठवण्यात आली आहे.
दरम्यान, जैन यांनी नोटीसला आव्हान दिले आहे. पण कायद्याप्रमाणे त्यांना त्या वादग्रस्त रकमेतील 20 टक्के रक्कम जमा करावी लागणार आहे. जर आम्ही केस हारलो तर सर्व रक्कम जमा करण्यासाठी व्यवसाय बंद करावा लागेल, असेही त्यांनी सांगितले.
ज्वेलर्स असोसिएशनच्या सचिवांनी दिलेल्या माहितीनुसार, जैन यांच्याप्रमाणे एकूण 15 हजार ज्वेलर्सना नोटीस पाठवण्यात आली आहे. ज्वेलर्स इंडस्ट्रीला पुढील काळात यामुळे मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. कारण ज्यांना 20 टक्के रक्कम भरावी लागणार आहे त्यांना क्रेडिटवर सोने खरेदी करावे लागेल, असेही त्यांनी सांगितले.
कोलकातामधील आयकर अधिकाऱ्याने कारवाईबद्दल सांगितले की, एखाद्या व्यक्तीचा मृत्यू कसा झाला आणि त्याच्या मारेकऱ्याला पकडण्यासाठी तीन वर्षांनी मृतदेहबाहेर काढला जात आहे. आयकर विभागाच्या दोन अधिकाऱ्यांनी रॉयटर्सला दिलेल्या माहितीनुसार, ज्वेलर्ससहित जवळपास हजार जणांना नोटीस पाठवण्यात आली आहे. यामधून 1.5 ते दोन ट्रिलियन कर जमा होईल असा अंदाज आहे.