लाखनगाव – देवगाव (ता. आंबेगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने बालदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी बालचमुंनी संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज आदी संतांच्या वेशभूषा परिधान केल्या होत्या. डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन विद्यार्थिनी दिंडीत सहभागी झाल्या होत्या. हातात भगवी पताका घेऊन ग्यानबा तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जयचा जयघोष करीत गावातून निघालेली ही दिंडी देवगावकरांना साक्षात पंढरीच्या वारीचाच अनुभव देऊन गेली. या उपक्रमाचे आयोजन मुख्याध्यापिका सुरेखा जाधव, मीना कोठावळे यांनी केले होते. सरपंच योगीनी दिलीप खांडगे आणि ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे कौतूक केले.