पुण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्याने घेतली अजित पवारांची भेट
पुणे : पुण्यातील प्रशासकीय सेवेतील एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याने आपली बदली रोखण्यासाठी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत त्यांना साकडे घातले. मात्र, ते आपल्या हातात नाही, तुमच्या मुलांच्या परिक्षा असतील तर मी तुम्हाला आणखी काही महिने बदलणार नाही. मात्र, त्यानंतर निर्णय घ्यावाच लागेल असे उत्तर दिले आहे. दरम्यान, दादा आणि या संबधित अधिकाऱ्याची भेट जिल्ह्याच्या तसेच शहरातील प्रशासकीय वर्तुळात चांगलाच चर्चेचा विषय बनली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून या अधिकाऱ्यावर शहर परिसरातील काही महत्वाच्या प्रकल्पांची जबाबदारीही दिली होती.
संबधित अधिकारी हा मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाच्या राज्यातील नेत्यांसह, स्थानिक नेत्यांच्याही अतिशय जवळचा असल्याचे समजले जाते. त्यामुळे लोकसभा तसेच विधानसभा निवडणूकीच्या काळात या अधिकाऱ्याबाबत राष्ट्रवादीचे स्थानिक पदाधिकारीही नाराज होते. त्यांनी आपली नाराजी अनेकदा जाहीरपणेही व्यक्त केली होती. त्यामुळे राज्यात सत्ताबदल होताच, भाजपच्या जवळील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जाणार असा कायस बांधला जात आहे.त्यात या अधिकाऱ्याचेही नाव असल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून उघडपणे सांगितले जात आहे. काही अधिकाऱ्यांनी पवार यांची भेट घेण्यास सुरूवात केली आहे. त्यात या अधिकाऱ्याचाही समावेश असल्याची शहरातील प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये जोरदार चर्चा आहे.