सातत्याने होतेय वाढ : गतवर्षीचा उच्चांक मोडणार?
पिंपरी – यंदाच्या हिवाळ्यामध्ये नऊ अंशापर्यंत घसरलेला तापमानाचा पारा आता उन्ह्याळ्याच्या तोंडावर वेगाने वरच्या दिशेने सरकू लागला आहे. महाशिवरात्रीपासून थंडी कमी होण्यास सुरुवात होते, असे मानले जाते. परंतु महाशिवरात्रीच्या आधीपासून उन्हाचे चटके आणि उकाडा जाणवू लागला आहे. मागील आठवड्याभरात नियमितपणे तापमानात वाढ होत असून, तापमानाची पस्तिशीकडे वाटचाल सुरु आहे. शनिवारी कमाल तापमान 34 अंशावर पोहचले होते. फेब्रुवारी महिन्यातच तापमान वेगाने वाढत असल्याने गतवर्षीचा उच्चांकी तापमानाचा विक्रम यावेळी मोडीत निघतो की काय? अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे.
मागील आठवडाभरापासून वातावरणात कमालीचा बदल होऊ लागला आहे. 1 फेब्रुवारी रोजी पिंपरी-चिंचवड शहराचे किमान तापमान 12 अंश तर कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस होते. मात्र मागील आठ दिवसामध्ये वातावरणात उकाडा जाणवू लागला आहे. तसेच तापमानामध्ये कमालीची वाढ होऊ लागली आहे. गुरुवारी कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस होते. शुक्रवारी यामध्ये काही प्रमाणात वाढ झाली तर आज शनिवारी पारा 34 अंशांपर्यत वर सरकला होता. तर रविवारी तापमानात वाढ होवून कमाल तापमान 35 अंशाच्या पुढे जाण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
थंडीचे दोनच महिने
नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत पाऊस झाल्यामुहे नोव्हेंबर महिना संपल्यानंतरच थंडी जाणवू लागली होती. डिसेंबर व जानेवारी महिन्यात तापमान 10 अंशापर्यंत खाली आले होते. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासून मात्र थंडी ओसरुन उकाडा जाणवू लागला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सकाळी व रात्री थंडी व दिवसभर कडक ऊन होते. 15 फेब्रुवारीपासून तापमानाचा पारा 30 अंशाच्या पुढे सरकल्याने उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत.