शिरूर तालुक्यातील दहीवडी येथील घटना
शिक्रापूर-दहीवडी (ता. शिरूर) गावच्या हद्दीमध्ये भीमा नदीकाठी वाळूचोरी होत असल्याबाबत शिरूर तहसीलदार यांच्याकडे तक्रार केली म्हणून तक्रारदारास शिवीगाळ, दमदाटी करत मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली म्हणून तक्रारदारासह एकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला असल्याची घटना घडली. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संदीप राजाराम सातकर व बाळू शंकर सातकर (दोघे रा. सातकरवाडी, दहिवडी) हे या हल्ल्यात गंभीर जखमी झाले असून दोघांवर शिक्रापूर येथील सूर्या हॉस्पिटल येथील अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. संदीप सातकर याने फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अमोल विठ्ठल सातकर, प्रमोद विठ्ठल सातकर व हनुमंत इंगळे (सर्व रा. दहिवडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
संदीप सातकर यांच्या जमिनीच्या शेजारी अमोल सातकर हे वाळू चोरी करत असल्याबाबत संदीप सातकर यांनी शिरूर तहसीलदार यांच्याकडे तक्रारी अर्ज केला होता. अमोल सातकर याने सहा डिसेंबर रोजी संदीप यास फोन करून तू माझे विरुद्ध शिरूर तहसीलदार यांच्याकडे तक्रार का केली, असे म्हणून शिवीगाळ, दमदाटी केली. याबाबत संदीप सातकर याने शिक्रापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दरम्यान रात्रीच्या वेळी संदीप हा शेतातील मोटार चालू करण्यासाठी भीमा नदीकाठी गेला असताना तेथे अमोल हा जेसीबीच्या सहाय्याने वाळू काढत होता. त्याने संदीपला जेसीबी खाली घालून मारण्याची धमकी देत शिवीगाळ केली.
यावेळी संदीप हा भीतीने शेतात पाणी देत असलेले चुलत्यांकडे पळत गेला. काही वेळातच अमोल सातकर हा चारचाकी गाडीतून त्याचा भाऊ प्रमोद व साथीदार हनुमंत इंगळे यांना घेऊन त्या ठिकाणी गेला. त्यावेळी अमोलकडे लोखंडी गज, त्याचा भाऊ प्रमोद याचेकडे कोयता होता यावेळी तिघांनी देखील संदीपला तू आमच्या विरोधात तहसीलदारांना तक्रार करतो का, असे म्हणून जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण करण्यास सुरवात केली. यावेळी संदीपचे चुलते बाळू सातकर हे भांडणे सोडविण्यासाठी आले असता तिघांनी त्यांनादेखील मारहाण केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मयूर वैरागकर व पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी हे करात आहे.
- दहिवडी येथे वाळू माफियांकडून झालेला हल्ला हा गंभीर स्वरूपाचा असून, या ठिकाणची पाहणी करून या प्रकाराबाबत मंडलाधिकारी व तलाठी यांच्याकडून माहिती घेऊन वाळू माफियांविरोधात कठोर कारवाई केली जाईल.
-लैला शेख, तहसीलदार शिरूर