कर्मचाऱ्यांचा असहकाराचा पवित्रा ; मनमानीचा आरोप
सातारा, दि. 19 (प्रतिनिधी) –
दोन महिने वैद्यकीय रजेवर गेलेले जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमोद गडीकर अचानक हजर झाल्यानंतर त्यांनी कारभार सुधारण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, या आश्वासनाला चोवीस तास उलटण्याआधीच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सह्यांची मोहीम तीव्र करून “गडीकर हटाव’चा नारा दिला आहे.
डॉ. गडीकरांनी जिल्हा रुग्णालयाचा कारभार हातात घेतल्यानंतर काही काळ सुरळीत सुरू असलेले हे रुग्णालय समस्यांच्या गर्तेत सापडले. त्यावर अनेकदा चर्चा व तक्रारी झाल्यानंतरही कारभारात सुधारणा करण्यात गडीकरांना अपयश आले.
त्यानंतर आरोग्य खात्यातील वरिष्ठांनी गडीकरांना सक्तीच्या रजेवर जाण्यास सांगितले. मात्र, त्यांनी वैद्यकीय रजेचा मार्ग निवडला होता. त्यानंतर जिल्हा रुग्णालयाचा कारभार डॉ. संजोग कदम यांच्याकडे आला होता.
कदम यांनी दोन महिने सर्वांना बरोरीने घेत कारभार सुरू केल्यानंतर गडीकर अचानक हजर झाल्याने जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे.
गडीकर हे कर्मचाऱ्यांना अपमानास्पद वागणूक देतात, कंत्राटी कर्मचाऱ्यांना पुन्हा नेमणूक देणार नसल्याची धमकी देतात. विविध योजनांच्या फायली प्रलंबित ठेवतात, कर्मचाऱ्यांना अत्यावश्यक कारणांसाठी रजा देत नाहीत, अशा तक्रारी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केल्या आहेत.
कर्मचाऱ्यांकडून डॉ. कदमांचे कौतुक
जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजोग कदम यांचे कौतुक केले आहे. डॉ. कदम यांच्या काळात रुग्णालयातील कर्मचारी, अधिकारी गुण्यागोविंदाने नांदत होते. रुग्णालयात स्वच्छता होती, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.