बारामती- तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयास विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्ली यांनी 2018-19 या शैक्षणिक वर्षांपासून स्वायत्तता दर्जा प्रदान केला. महाविद्यालयाने या शैक्षणिक स्वायत्ततेचा फायदा घेऊन अभ्यासक्रमामध्ये अमुलाग्र बदल करून घेतलेले आहेत. रेग्युलर डिग्रीसोबत कौशल्याभिमुख व रोजगाराभिमुख जवळपास 80 सर्टिफिकेट कोर्सेस सुरु केले आहेत. विद्यार्थ्यांना रेग्युलर पदवीबरोबर त्यांच्या आवडीनुसार किमान पाच सर्टिफिकेट कोर्सेस पूर्ण करण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. या योजनेमध्ये कोणत्याही शाखेचा विद्यार्थी त्याच्या आवडीचे कोर्सेस निवडू शकतो उदा.
कला शाखेचा विद्यार्थी शास्त्र किंवा वाणिज्य शाखेची निवड करून आपल्या आवडीचे कौशल्य प्राप्त करू शकतो. यामध्ये एक कोर्स दोन क्रेडिट (30 तास) तीन महिने कालावधीचा असेल. या कोर्सेसचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये 75 टक्के प्रॅक्टिकल व 25 टक्के थेअरी असेल. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवून पूर्ण तयारी नुसार नोकरी मिळविण्यास सक्षम होणार आहेत, असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर मुरूमकर यांनी सांगितले.