जमीन तिघांना विकली : तिसऱ्या खरेदीदारामुळे झाले उघड
शिक्रापूर – जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी एकाच जमिनीची अनेकांना विक्री करून, खरेदीखत करून फसवणूक केली जात असल्याच्या घटना नेहमी उघडकीस येत असतात. आता चक्क शिरूर तालुक्यातील एका गावच्या सरपंचाने त्यांच्या स्वतःच्या जमिनीची तिघांना विक्री करून फसवणूक केली असल्याची घटना समोर आली असून शिक्रापूर पोलीस ठाण्यात टाकळी भीमाच्या सरपंचावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रवींद्र बाळासाहेब दोरगे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सरपंचाचे नाव आहे. तर दत्तात्रय रामचंद्र पासलकर (रा. केसनंद, ता. हवेली) यांनी फिर्याद दिली. रवींद्र दोरगे यांनी त्यांच्या जमीन गट नंबर 543 मधील 64 गुंठे जमीन दत्तात्रय पासलकर यांना ऑक्टोबर 2015मध्ये तळेगाव दुय्यम निबंधक कार्यालय येथे 6205/2015 या नोंदणी क्रमांकाने खरेदीखत करून विक्री केली होती. या जमिनीचा मोबदला म्हणून ठरलेली 20 लाख रुपयांची रक्कम पासलकर यांनी धनादेशाद्वारे रवींद्र दोरगे यांना दिलेली होती. ही रक्कम दोरगे यांच्या बॅंक खात्यावर जमा देखील झालेली आहे. त्यानंतर डिसेंबरमध्ये पासलकर यांनी टाकळी भीमा गावकामगार तलाठी यांच्याकडे या जमिनीच्या सातबारामध्ये पासलकर यांच्या नावाची नोंद होण्यासाठी जमिनीच्या खरेदी खताच्या दस्ताची प्रत देऊन अर्ज केला. त्यावेळी तलाठी यांनी नोंद करून घेतो असे सांगितले. काही दिवसांनी पासलकर यांनी जमिनीच्या सातबारामध्ये त्यांच्या नावाची नोंद का झाली नाही? याबाबत चौकशीसाठी तलाठी कार्यालय येथे गेले असता दोरगे यांनी पासलकर यांच्या आधीच श्वेता सुदीप गुंदेचा (रा. तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर) यांना या जमिनीची विक्री केली असून त्याचा नोंदणी क्रमांक 6129/2015 असा आहे.
गुंदेचा यांनी यापूर्वी जमिनीवर त्यांच्या नावाच्या नोंदीसाठी अर्ज दिलेला असल्याने सातबारामध्ये जमीन गट नंबर 543 मधील 64 गुंठे जमीनीवर श्वेता गुंदेचा यांच्या नावाची नोंद लागली आहे. त्यामुळे तुमच्या नावाची नोंद लावता येणार असल्याचे तलाठ्यांनी स्पष्ट केले. याशिवाय त्याच जमिनीचे खरेदीखत दोरगे यांनी शिक्रापूर येथील चेतन बळीराम कड यांना देखील दुय्यम निबंधक कार्यालय, शिरूर येथे 5294/2015 या नोंदणी क्रमांकाने करून देऊन जमिनीची विक्री केली असल्याचे समजले. यानंतर पासलकर यांनी दोरगे यांच्याकडे जाऊन 20 लाख रुपये परत देऊन हा व्यवहार रद्द करण्याबाबत सांगितले असता, दोरगे यांनी त्याबाबत नकार दिला. त्यामुळे दोरगे यांनी पासलकर यांची आर्थिक फसवणूक केली असल्याचे फिर्यादित नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवशांत खोसे हे करीत आहेत.
- दोरगे यांच्यावर यापूर्वी देखील गुन्हा दाखल
एकाच जमिनीची तिघांना विक्री करून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले रवींद्र बाळासाहेब दोरगे यांच्यावर काही दिवसांपूर्वी विद्युत वितरण विभागाच्या अधिकाऱ्याला शिवीगाळ दमदाटी करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला असल्याची माहिती देखील शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे. - या प्रकरणाला गावातील काही विरोधकांनी वेगळे वळण दिलेले आहे. दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत आमचे आपापसांत मिटले आहे. आमही प्रकरण वाढवू इच्छित नाही.
-रवींद्र दोरगे, सरपंच टाकळी भीमा