- चालकाला मारहाण करून चोरी करणाऱ्या तीन चोरट्यांना अटक
कामशेत – थरगावच्या गावच्या हद्दीतील जुना पुणे-मुंबई महामार्गावर ट्रेलर बंद पडल्याने चालकाने ट्रेलर महामार्गालगत उभा करून गाडीत झोपला असताना तीन जणांनी ट्रेलर चालकास मारहाण केली. त्याच्या ताब्यातील रोख रक्कम व मोबाईल चोरल्याची घटना शनिवारी (दि. 22) मध्यरात्री घडली आहे.
धीरज सुधीर गरवड (रा. भाजे,) उमेश वसंत बालगुडे (रा. पाथरगाव, ता मावळ, जि पुणे), प्रवीण मुरलीधर सावंत (रा. सावंतवाडी महागाव जि पुणे) असे अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत.
ट्रेलर चालक धर्मात्मा विवेकनंद पटेल यांनी फिर्याद दिली आहे. ते त्याच्या जवळील ट्रेलरमध्ये (एम. एच. 16 बी. एफ. 6457) सोयाबीन माल भरून नवघर मुंबईकडून पुण्याकडे जाण्यासाठी निघाला होता. पाथरगावच्या हद्दीतील पुणे-मुंबई महामार्गावर ट्रेलर बंद पडल्याने ट्रेलर चालक वाहनाच्या केबिनमध्ये झोपला होता. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन यातील तीन चोरट्यांनी शनिवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास वाहनाजवळ येऊन ट्रेलर चालकास दरवाजा उघडण्यास सांगितला. त्यानंतर तिघेही “क्लीनर साइड’ची काच फोडून गाडीत घुसले.
फिर्यादी यास लाकडी काठीने डोक्यावर, हातावर, पायावर, मारहाण करून त्याच्याकडील तीन हजार रुपयांची रोख रक्कम व मोबाईल असा एकूण 3500 रुपये किमतीचा मुद्देमाल जबरदस्तीने चोरून नेला. त्यांच्याकडील टेम्पो (एम.एच. 14 जी.यु. 7167) मधून लोणावळा दिशेने पळून गेले.
याबाबत चालकाने पोलिसांना त्वरित माहिती माहिती दिल्याने पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार हनुमंत वाघमारे, पोलीस हवालदार शिवाजी सस्ते, पोलीस कर्मचारी संतोष दोरके यांनी चालकाने दिलेल्या माहितीनुसार आरोपींचा पाठलाग केला.आरोपी धीरज गरवड, उमेश बालगुडे, प्रवीण सावंत या तिघांना लोणावळा येथील सनी ढाब्याजवळ ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे तपास करीत आहेत.