लाखोंची उलाढाल, अनेक धनिक कंगाल. पोलिसांचे अस्त्र म्यान
दत्तात्रय गायकवाड
वाघोली- पुणे शहरात मोड्या प्रमाणात सुरू असलेल्या पत्त्यांच्या क्लबवर कारवाई झाली आहे. आता हेच क्लब पुणे शहरालगत असणाऱ्या पूर्व हवेलीतील सधन गावांत दिमाखात सुरू आहेत. पोलिसांची करडी नजर (?) चुकवून जुगारमाफियांनी बस्तान बसविले आहे. पोलिसांनी आतापर्यंत त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला नसल्यामुळे जुगार अड्ड्यावर लाखोंचे इमले बांधले जात आहे. या अड्ड्यांवर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.
पूर्व हवेलीमध्ये सुरू असलेल्या पत्त्यांच्या क्लबमधून लाखो रुपयांची उलाढाल दर दिवसाला होत आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर आदी ठिकाणांहून पत्ते खेळणारे हवेली तालुक्यात येताना दिसत आहेत. वाढत्या संख्येमुळे या धंद्याना उभारी मिळाली आहे. एक डाव आठ ते दहा लाखांचा असल्यामुळे खेळणाऱ्यांना विशेष लग्झरी सेवा पुरवली जाते. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष असल्यामुळे बिनधास्तपणे पूर्व हवेलीत पत्त्यांचे क्लब सुरू आहेत, सध्या त्यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे. पूर्व हवेलीत अवैध वाहतूक, गांजा विक्री, गुटखा विक्री, बेकायदा दारू विक्री, हातभट्टीची दारू आदी अवैध धंद्यांवर कारवाई केली जाते. वाघोली येथे 57 लाख रूपायांचा गुटखा पकडण्यात आला आहे.
याशिवाय हवेली पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांनी गुटख्यावर कडक कारवाई केली आहे. याचप्रमाणे पत्यांच्या क्लबमधून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत असतांना क्लब चालकांवर कारवाई करण्यास “अर्थपूर्ण’ दुर्लक्ष केले जात असल्याची चर्चा आहे. पोलिसांकडून इतर अवैध धंद्यांविरोधात कारवाई केली जाते. खरे तर पत्त्यांच्या क्लब चालकांवर कारवाई केल्यास इतर धंद्यापेक्षा ही कारवाई मोठी ठरू शकते. परंतु पोलिसांचे हात बांधले असल्याची चर्चा रंगत आहे.
- एक डाव आठ ते दहा लाखाचा
जुगार क्लबमध्ये एक डाव 8 ते 10 लाखांचा असून दिवसरात्र असे अनेक डाव चालवले जातात. सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक आदी जिल्ह्यातून खेळण्यासाठी येणाऱ्यांना जेवण, सिगारेट, दारू आदीसह दर्जेदार सेवा पुरवल्या जातात. त्यांची बडदास्त ठेवली जात आहे. हा खर्च लाखोंच्या घरात आहे. महत्वाच्या ठिकाणासह माळरानावर खुल्या मैदानात सुद्धा डाव रंगत आहेत. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. - कोटी रुपयांची रोकड
पत्त्यांच्या क्लबमध्ये खेळण्यासाठी लाखो रुपयांची रोकड जवळ बाळगण्यात येत आहे. पैसे नसले तर गळ्यातील चैन, हातातील ब्रेसलेट याची बोली लावली जाते. वेळप्रसंगी गाड्या, शेती यांची देखील बोली लावण्यात येते. रिझर्व्ह बॅंकेने रोख रकमेबाबत बंधने घातली असताना क्लब चालवणारे मात्र सर्व मिळून कोटी रुपयांची रोकड रोज हाताळतात हे मात्र वास्तव आहे. यात क्लबमध्ये अनेक धनाढ्य लोक पैशांच्या हव्यासापोटी कंगाल होत आहे. त्यामुळे अनेकांचे कुटुंबे जुगारामुळे उघड्यावर पडली आहेत. याचे सोयरसूतक पोलीस प्रशासनाला नाही. - अंतिम विजेता क्लब चालक
खेळणाऱ्यांमध्ये हार- जीत असली तरी सर्व सुविधा पुरवणारे पत्त्यांचे क्लब चालक जादा नफा मिळवत आहेत. तेच अंतिम विजेता ठरत असल्याचे चित्र आहे. मोठे कनेक्शन असणारा हा बेकायदा धंदा तातडीने बंद करण्याची मागणी सध्या जोर धरू लागली आहे. - पूर्व हवेलीतील अनेक गावांत असणाऱ्या पत्त्यांच्या क्लबवर कडक कारवाई करण्यात येणार येईल. या कारवाईत कोणाचीही गय केली जाणार नाही.
डॉ.सई भोरे पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, हवेली.