हैदराबाद : आपल्या जन्मदात्या आईचा खून प्रियकराच्या मदतीने करून तिच्या मृतदेहा सोबत प्रियकरासह तीन दिवस राहण्याची धक्कादायक घटना येथे घडली.
हैदराबादच्या हयातनगरमधील मुनागुनरू गावात 18 ऑक्टोबर रोजी ही घटना घडली. मात्र सोमवारी ती उजेडात आली. पोलिसांनी या आरोपींना अटक केली. या 19 वर्षीय कीर्ती रेड्डी हिने तिची आई रजिता यांचा खून केला. तिचे दोन युवकांसोबत असणाऱ्या प्रेमसंबंधाला ती विरोध करत असल्याने तिने हे घृणास्पद कृत्य केले. पदवीचे शिक्षण घेणाऱ्या कीर्तीने आईचा गळा दाबून खून केला. त्यावेळी तिच्या प्रियकराने त्यांचे पाय दाबून धरले होते.
रंजिता मरण पावल्याची खात्री पटल्यावर मृतदेह घरात ठेवून ते दोघे तीन दिवस तेथेच राहिले. त्याचा वास असह्य झाल्यानंतर तो मृतदेह त्यांनी रामण्णापेटजवळ रेल्वे रूळांवर टाकून दिला. कीर्तीचे वडील श्रीनिवास रेड्डी ट्रकचालक आहेत. ते घरी परतल्यावर आईचा ठावठिकाणा सांगण्यास कीर्ती टाळाटाळ करू लागली. मी विशाखापट्टणमला गेले होते. परत आल्यापासून आई दिसलीच नाही, असे तीने सांगितले.
श्रीनिवास यांनी या पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत दिली. तपासात कीर्ती विसंगत माहिती देत असल्याने तिच्यावरील संशय बळावला. त्यामुळे तिची कसून चौकशी केला असता तीने गुन्ह्याची कबुली दिली.