वॉशिंग्टन- अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीविषयी नुकत्याच घेण्यात आलेल्या एका जनमत चाचणीत डमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बिडेन यांन विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर चांगलीच आघाडी घेतलेली दिसून आली आहे. अमेरिकेतील वाढता वर्णद्वेष, करोनाचा मोठ्या प्रमाणावर झालेला प्रसार आणि वाढती बेरोजगारी हे मुद्दे ट्रम्प यांच्या विरोधात जात असल्याचेही या चाचणीत आढळून आल्याने ट्रम्प यांच्यासाठी ही निवडणूक म्हणजे अत्यंत कठीण आव्हान ठरू लागले आहे.
येत्या 3 नोव्हेंबर रोजी अध्यक्षपदासाठीचे मतदान होत आहे. त्याच्या प्रचारालाही आता वेग येत आहे. अमेरिकेतील प्रख्यात फॉक्स न्युज चॅनेलने ही जनमत चाचणी घेतली. त्यात बिडेन आणि ट्रम्प यांच्यातील फरक आता वाढत चालला असून बिडेन हे ट्रम्प यांच्या पेक्षा 12 पॉईन्टने आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे.
गेल्या आठवड्यात घेण्यात आलेल्या जनमत चाचणीत बिडेन हे ट्रम्प यांच्या पेक्षा 8 पॉइॅन्टने आघाडीवर होते. या आठवड्यात त्यांची ही आघाडी आणखी चार पॉईन्टने वाढून 12 पाईन्ट इतकी झाली आहे. 13 ते 16 जून या अवधीत घेण्यात आलेल्या जनमत चाचणीत 50 टक्के मतदारांनी बिडेन यांच्या बाजूने आपला कौल दिला तर 36 टक्के मतदारांनी ट्रम्प यांच्या बाजूने आपला कौल दिला आहे. ज्यो बिडेन हे अमेरिकेचे माजी उपाध्यक्ष आहेत.
त्यांच्या उमेदवारीवर डेमोक्रॅटिक पक्षाने नुकतेच शिक्कमोर्तब केले असले तरी त्यांच्या प्रचाराला जनतेकडून मात्र फारसा उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला नव्हता, तरीही त्यांनी जनमत चाचणीत मात्र ट्रम्प यांच्यावर सुरूवातीच्या टप्प्यातच मोठी आघाडी घेतल्याने त्या विषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे.