पॅरिस : करोना विषाणूने जगभरात 35 हजारांपेक्षा अधिक रूग्णांचा बळी घेतला आहे. त्यातील दोन-तृतीयांशपेक्षा अधिक मृत एकट्या युरोप खंडातील आहेत.
सर्वप्रथम चीनमध्ये उद्रेक झालेल्या करोनाने आता संपूर्ण जगात कहर केला आहे. त्याची सर्वांधिक झळ युरोपला बसली आहे. करोनामुळे होणाऱ्या कोविड-19 आजाराने इटलीत 10 हजारहून अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत. ती संख्या जगातील सर्वांधिक आहे.
इटलीपाठोपाठ स्पेनमध्ये 7 हजारहून अधिक बळींची नोंद झाली आहे. त्याशिवाय, फ्रान्समधील मृतांची संख्या 2 हजार 600 वर पोहचली आहे. जगभरात 7 लाख 38 हजारहून अधिक करोनाबाधित आढळले आहेत. त्यातील निम्मे युरोपमधील आहेत.
जगभरातील करोनाबाधितांचा विचार करता अमेरिकेतील संख्या सर्वांधिक ठरली आहे. त्या देशातील जवळपास दीड लाख नागरिकांना करोनाचा संसर्ग झाला आहे. इराणमध्येही करोनाने मोठे थैमान घातले आहे. त्या देशात 2 हजार 700 हून अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत. जगातील 199 देश आणि प्रदेशांमध्ये करोनाचा फैलाव झाला आहे. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेपुढेही मोठे संकट उभे राहिले आहे.