तीन साथीदार फरारी : तडीपारीचा प्रस्ताव वरिष्ठांकडे सादर
लोणी काळभोर- कवडीमाळवाडी, कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील सुभाष घाडगे व नंदकुमार घाडगे या चुलता-पुतण्यावर दोन दिवसांपूर्वी कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीतील दोन जणांना अटक करण्यात यश मिळवले आहे. पोलिसांनी रविवार (दि. 12) रोजी पहाटे राजू रवींद्र पवार व संकेत सुनील गायकवाड (दोघे रा. गुजरवस्ती, कवडीपाट, ता. हवेली) यांना अटक केली आहे. त्यांचे तीन साथीदार फरार झाले असून त्यांना लवकरच अटक करण्यात येईल, असे लोणी काळभोरचे पोलीस निरीक्षक सूरज बंडगर यांनी सांगितले.
दोन दिवसांपूर्वी पाच जणांनी किरकोळ कारणांवरून सुभाष घाडगे व नंदकुमार घाडगे यांच्यावर कोयत्याने वार केला होता. याप्रकरणात वरील आरोपीना पोलीस मदत करत असल्याच्या संशयावरुन शुक्रवार (दि. 10) रोजी रात्री अकराच्या सुमारास संतप्त जमावाने सोलापूर महामार्गावर कदमवाकवस्ती (ता. हवेली) हद्दीतील कवडीपाट टोलनाक्यावर रस्ता रोको करून पोलिसांच्या वाहनावर दगडफेक केली होती. यामध्ये तीन पोलीस जखमी झाले होते.
गुरुवार (दि. 9) नंदकुमार घाडगे यांच्यावर राजू पवार याने कोयत्याने हल्ला केला होता. याप्रकरणी पोलिसांनी राजू पवार यास शुक्रवारी अटक केली होती. मात्र, न्यायालयाने या प्रकरणात पवार याला जामीनावर सोडले होते. जामीनावर सुटताच पवार याने संकेत सुनील गायकवाड, ऋषिकेश पवार, नान्या पारडे व शंकर धायगुडे या चार सहकाऱ्यांच्या मदतीने सुभाष घाडगे यांच्यावरही कोयत्याने शुक्रवार वार केले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच, पाचही आरोपी फरार झाले होते. मात्र लोणी काळभोर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे व पोलीस हवालदार समीर चमणशेख या दोघांनी रविवारी पहाटे राजू पवार यास सातारा येथून तर संकेत गायकवाड याला स्वारगेट येथून अटक केली. वरील दोन्ही आरोपींना न्यायालयाने चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले यांनी दिली.
लोणी काळभोरचे पोलीस निरीक्षक सूरज बंडगर म्हणाले, राजू रवींद्र पवार व संकेत सुनील गायकवाड या दोघांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित तीन जणांना पुढील काही तासात अटक करण्यात येणार आहे. या पाचही आरोपींवर सुभाष घाडगे व नंदकुमार घाडगे याच्यावर खुनी हल्ला केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. वरील आरोपींवर यापूर्वीही काही गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत. या सर्व गुन्ह्याची माहिती एकत्रित करून पाचही जणांना पुणे जिल्ह्यातून किमान दोन वर्षांसाठी तडीपार करण्यासाठीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे. यापुढील काळात कायदा हाती घेणाऱ्यांना कडक कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. तसेच वरील पाच आरोपींच्या मागे असणाऱ्या व्यक्तीची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. संबधितावरही कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
- पुण्याच्या माजी नगरसेविकेवरही गुन्हा
पुणे – सोलापूर महामार्गावर याच प्रकरणात शुक्रवारी (दि. 10) रोजी रात्री जमाव जमवून पोलिसांच्या वाहनावर दगडफेक व शिवीगाळ केल्याप्रकरणी व पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी पोलीस नाईक शंकर तानाजी साळुंखे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी पुणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका सुरेखा मकवान यांच्यासह जयसिंग घाडगे, नंदकुमार घाडगे, सुभाष घाडगे, गणेश घाडगे, सचिऩ घाडगे, रमेश घाडगे, जीवण घाडगे, सचिन दाभाडे, बाळासाहेब दाभाडे, अजय मुळेकर, निलेश घाडगे, विलास घाडगे, अनुराग घाडगे, बंटी चव्हाण यांच्यासह चाळीसहुन अधिक अऩोळखी महिला व चाळीसहुन अधिक अनोळखी पुरुषांच्यावर गुन्हे दाखल केला आहे. मात्र वरील पैकी एकाही आरोपींला रविवारी रात्री पर्यंत अटक करण्यात आली नव्हती.