वॉशिंग्टन – करोना विषाणुंच्या प्रसाराबद्दल रशिया, चीन, आणि इराण या देशांनी अफवा पसरवल्या असा आरोप अमेरिकेचे विदेश मंत्री माईक पॉम्पेओ यांनी केला आहे. तथापी अमेरिकेने याचे निकाररण करीत त्याच्या प्रसारावर नियंत्रण आणण्यासाठी समन्वयाने प्रयत्न केले आहेत असे त्यांनी म्हटले आहे.
या अफवा नाहीशा करण्यासाठी अमेरिकेने योग्य पावले उचलली असे पत्रकारांना सांगताना पॉम्पेओ म्हणाले की करोना किंवा कोविद -19 विषाणुंच्या प्रसाराबद्दलची माहिती खात्रीशीर सूत्रांकडूनच तपासून घ्या अशा सुचना आम्ही आमच्या जगभरातील नागरीकांना केल्या आहेत. मार्केट मधील अफवांवर अजिबात विश्वास न ठेवण्याची आमची सुचना नागरीकांच्या कामी आली असे ते म्हणाले त्यामुळे या अफवांच्या फैलावण्याला आळा घातला गेला आहे असेही त्यांनी नमूद केले. ते म्हणाले की हा विषाणु पहिल्यांदा अमेरिकन लष्करातून पसरल्याचीही अफवा पसरवली गेली होती. त्यानंतर आम्ही ऍक्टिव्ह झालो आणि या अफवांच्या मोहीमेचे निर्दालन केले. रशिया, चीन आणि इराणनेच या अफवा पसरवल्या होत्या असा आरोप त्यांनी केला.
करोनाच्या विरोधात लढण्याची लढाई कठीण असल्याचे मान्य करून ते म्हणाले की, तथापि आम्ही त्यावर सर्व शक्य ती उपाययोजना केली आहे. अमेरिकेत गेल्या 50 तासात तब्बल 10 हजार लोकांना या विषाणुंची लागण झाली असल्याचे आढळून आले असून आता त्या रोगाची लागण झालेल्यांची तेथील संख्या 18 हजारावर गेली आहे. जगातल्या 160 देशांमध्ये हा विषाणु पसरला असून त्याची जगभरातील 2 लाख 75 हजार 427 लोकांना बाधा झाली आहे. तर 11 हजार 397 लोक त्यात मरण पावले आहेत.