सलग तीन दिवस विजेच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी
चिंबळी – खेड तालुक्यात दक्षिण भागातील चिंबळी परिसरात गेल्या तीन दिवसांपासून विजेच्या कडकडाटसह वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पाऊस हजेरी लावलात आहे. दरम्यान सोमवारी (दि. 10) सायंकाळी सहाच्या सुमारास जोरदार गारा बरसल्याने सगळ्यांची एकच धांदल उडाली होती.
गेल्या तीन ते चार महिन्या पासून सूर्य आग ओकत असल्याने सगळेच उष्णतेने हैराण झाले होते. त्यातच यंदा 1972 पेक्षाही तीव्र दुष्काळ पडल्याने पाण्यावाचून सगळ्यांचेच हाल झाले. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून सायंकाळी मान्सूनपूर्व पाऊस बरसत असल्याने नागरिकांना थोडाका होईना पण उष्णतेपासून दिलासा मिळाला. त्याचबरोबर या मान्सूनपूर्व पावसामुळे यंदा मान्सून पाऊस दिलासा देईल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. खेड तालुक्याच्या दक्षिण भागातील चिंबळी, कुरुळी, मोई, निघोजे, केळगावम मरकळ, सोळू, धानोरे, चऱ्होली परिसरात गेल्या तीन दिवसांपासून वादळीवारे, विजेच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली.
या वादळीवाऱ्यामुळे काही ठिकाणी घराचे पत्रे उडाले, बाजरी, भुईमूग पिकांची झाडे झोपली असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. आधीच दुष्काळने मारले आता मान्सूनपूर्व पावसाने मारले त्यामुळे शेतरी दुष्काळात तेरावा महिना अभुभवत असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिल्या. या पावासाबरोबरच रात्री वीजपुरवठा ही खंडीत होत असल्याने मच्छारांचा उपद्रव वाढल्याने रोगराई पसरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच सोमवारी दमदार गारा बरसल्याने तरकारी पिकांचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. तरी, मान्सूनपूर्व पावसाने दिला दिला असला तरी बळीराजा मान्सून पावसाच्या प्रतीक्षेत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.