पुणे- चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा डोक्यात जड वस्तूने वार करत खून करण्यात आला. खून केल्यानंतर पती घटनास्थळावरुन पळून गेला आहे. उत्तमनगर पोलिसांचे पथक पतीच्या शोधासाठी रवाना झाले आहे. ही घटना मंगळवारी दुपारी हवेली तालूक्याती खडकवाडतील ढमढेरे पोल्ट्री फार्ममध्ये घडली.
पुजा तुषार ढमढेरे(30) असे मृत महिलेचे नाव आहे. तर तुषार उर्फ बबलु राजाराम ढमढेरे(35) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक वाघमारे यांनी सांगितले, पुजा व तुषार यांचा विवाह 30 नोव्हेंबर 2011 रोजी झाला होता. बबलूचा खडकवाडी येथे ढमढेरे पोल्ट्री फार्म नावाने पोल्ट्रीचा व्यवसाय आहे. पोल्ट्री शेजारील एका खोलीतच ते रहात होते. विवाहानंतर तो सतत पुजाच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यातूनच त्याने तीला मोबाईल फोन वापरण्यास मनाई करुन शिवीगाळ केली होती. तो तीला रविवारपासून सातत्याने त्रास देत होता, एकदा तीच्यावर चाकु घेऊन मारण्यास धाऊनही गेला होता. दरम्यान मंगळवारी त्याने तीच्या डोक्यावर कठीण वस्तूने वार करुन खून केला. यानंतर तो घरातून पळून गेला. याची खबर त्याच्या नातेवाईकांनी पुजाच्या घरच्यांना दिली. यानंतर पुजाच्या घरच्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांना माहिती दिली.