वाहनचालकांची “सर्कस : पादचारांची कुंचबणा
महाळुंगे इंगळे- गेल्या 15 दिवसांपासून महाळुंगे इंगळे व परिसरातील खालुंब्रे, खराबवाडी, नाणेकरवाडी, येलवाडी, सांगूर्डी, कान्हेवाडी आदि भागात संततधार सुरू असल्याने चाकण-तळेगाव दाभाडे रस्ता “खड्ड्यां’त गेला असून त्यास तलावाचेही स्वरूप आले आहे. त्यामुळे वाहनचालकांची “सर्कास’ होत असून पाणी अंगावर उडत असल्याने पादचाऱ्यांची कुंचबणा होत असल्याने स्थानिक संतप्त झाले असून त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
सत्ताधाऱ्यांची सर्वच आश्वासने फोल ठरत असून, नागरिक व प्रवासी रस्ता रुंदीकरण व रस्ता दुरुस्तीच्या प्रतिक्षेत आहेत. महाळुंगे इंगळे भागात मोठी दुर्घटना टाळण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. रात्रीच्या वेळी अचानक समोर असलेले खड्डे वाहकांना दिसत नसल्याने मोठे अपघात झाले आहेत. चाकण-तळेगाव दाभाडे रस्त्यावरील महाळुंगे इंगळे व परिसरातील महामार्गाची अतिशय दयनीय अवस्था झाली असूनही रस्त्याच्या दुरुस्तीकडे संबंधितांचे दुर्लक्ष झाल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. या राज्य मार्गावरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी मोठ्या आकारातील खड्डे पडल्यामुळे व त्यात पाणी साचल्याने वाहनचालकांना ते लक्षात येत नसल्याने अपघात घडत असून वाहनांचेही नुकसान होत आहे.