चाकण – जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्याकडून जास्तीचे व्याज लुबाडणाऱ्या सहा खाजगी सावकारांना चाकण पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई रविवारी (दि.9) करण्यात आली. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे खाजगी सावकारी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
मंदार परदेशी, रंगा ठोंबरे, गारगोटे सर, अस्लम शेख, सचिन शेवकरी, दत्ता खेडकर (सर्व रा. चाकण) अशी अटक केलेल्या सावकारांची नावे आहेत. याप्रकरणी माधुरी विशाल सायकर (वय 25) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, माधुरी यांचे पती विशाल यांनी 2017साली मंदार परदेशीकडून दरमहा आठ टक्के दराने पाच लाख रुपये, रंगा ठोंबरे याच्याकडून दरमहा आठ टक्के दराने तीन लाख रुपये, गारगोटे याच्याकडून दरमहा पाच टक्के दराने पाच लाख रुपये, अस्लमकडून सात रुपये टक्क्यांनी सहा लाख रुपये, सचिन आणि दत्ता या दोघांकडून दहा रुपये टक्क्यांनी सहा लाख रुपये आणि महालक्ष्मी फायनान्सचे तीन लाख रुपये सहा रुपये टक्के व्याजदराने घेतले. वरील सर्व खासगी सावकारांकडून विशाल सायकर यांनी एकूण 28 लाख रुपये व्याजाने घेतले. त्याचे व्याज त्यांनी वेळोवेळी दिले. तरीही यातील काही सावकारांनी त्यांच्या दुकानावर येऊन तसेच फोनवरून पैशांबाबत तगादा लावला. शनिवारी (दि. 8) रात्री साडेदहाच्या सुमारास सायकर यांच्या घरात घुसून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.