घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद ; समर्थ पोलिसांची कारवाई
पुणे,दि.3- घरफोडी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगारास समर्थ पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्याच्या ताब्यातून घरफोडीचा 1 लाख 10 हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. त्याच्याकडून चार घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
अल्लामक्ष महंमद पिरजादे(30,रा.जुना बाजार) असे अटक आरोपीचे नाव आहे.
समर्थ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका घरफोडीचा तपास करताना समर्थ पोलिसांना काही सीसीटीव्ही फुटेज मिळाले होते. त्यानूसार पोलिस त्याचा शोध घेत होते. दरम्यान पोलीस शिपाई साबळे यांना तो समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सायकलवर संशयास्पदरित्या फिरताना आढळला. त्यांनी याची खबर वरिष्ठांना दिल्यावर सापळा रचण्यात आला. आरोपीला पोलिसांची चाहूल लागताच तो पळून जाऊ लागला होता.मात्र अजय शितोळे, बाळासाहेब भांगले आणी निलेश साबळे यांनी पाठलाग करुन त्याला पकडले. त्याच्या घरझडतीत चोरीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले. त्याच्यावर यापुर्वीही घरफोडीचे गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त मंगेश शिंदे, पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलीस आयुक्त प्रदिप आफळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, पोलीस निरीक्षक विनायक साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अतकरे, पोलीस कर्मचारी लोणकर, काळे, निलेश साबळे, शितोळे, भांगले, शिंदे, कोळी, पवार, सुर्यवंशी यांच्या पथकाने केली.
—अशी होती गुन्हेगारीची पध्दत–
आरोपी पिरजादे हे मोलमजुरीची कामे करतो. घरफोडी करण्याआधी तो सायकलवरुन शहरातील मध्यवर्ती परिसरात फिरत असे. तेथील एखाद्या सोसायटीमध्ये जाऊन तो बंद घरे हेरत असे. संधी मिळाल्यास दुपारी तो घरफोडी करत असे, अन्यथा रात्री घरफोडी करुन तो किंमती ऐवज चोरत होता.