गुन्हे शाखेकडून मध्यवर्ती भागातील जुगार आणी लॉटरी अड्ड्यांवर छापा
पुणे,दि.5- गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील मध्यवर्ती फरासखाना परिसरात लॉटरी आणी जुगार अड्डयांवर छापे टाकले. या छाप्यात जुगार आणी लॉटरीचे 14 लाखांचे साहित्य जप्त करण्यात आले. तसेच जुगार खेळणाऱ्या आणी चालवणाऱ्या 54 जणांवर कारवाई करण्यात आली. फरासखाना परिसरात मोठ्या प्रमाणात जुगार आणी लॉटरीचा व्यवसाय अनेक वर्षापासून सुरु आहेत. सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत राकेश लॉटरी सेंटरवर सिंगल डिजिट ब्रॅकेट लॉटरी नावाचा जुगार चालत असल्याची माहिती गुन्हे शाखेला प्राप्त झाली होती . त्यानूसार छापा टाकला असता सदर ठिकाणी एकूण 10 व्यक्ती जुगार खेळताना आढळल्या तेथून 1,01,160/-रुपये रोख, 11 मोबाईल फोन (किं. 78000), एक कॉम्प्युटर सेट ( किं. 10,000), व्हिडिओ गेम (किं 10,000) असा एकूण 1,99,160 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आलेला आहे. तसेच साई व केतन लॉटरी सेंटरमध्ये सिंगल डिजिट व सोरट लॉटरी नावाचा जुगार खेळत असताना 16 व्यक्ती आढळल्या. त्यांच्याकडून 2,09,440/-रुपये रोख, 16 मोबाईल फोन (किं. 83,000), 3 कॉम्प्युटर सेट ( किं. 45000), 8 व्हिडिओ गेम मशीन (किं 1,60,000) असा एकूण 4,97,440 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आलेला आहे.
एकूण मुद्देमाल 14 लाखाचा हस्तगत
तसेच परिसरातील इतरही लॉटरी सेंटरवर कारवाई करण्यात आली. एकूण केलेल्या कारवाईत एकूण 6.2 लाखांची रोकड, 54 मोबाईल, आठ संगणक, 17 व्हिडीओ गेम असा 14 लाखंचा ऐवज हस्तगत करण्यात आला. यामध्ये सहा वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच 52 जणांना आरोपी करण्यात आले.
या कारवाईत सहायक पोलीस आयुक्त विजय चौधरी, पोलीस निरीक्षक मोहिते, सहायक पोलीस निरीक्षक जाधव आणी इतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.