मनुष्य बळाअभावी तपासणी होत नसल्याची तक्रार
राजगुरूनगर – खेड तालुक्यातील शाळांची तपासणी होत नसल्याने अनेक खासगी शाळांची मनमानी सुरू असल्याची पालकांची ओरड आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालक पुणे यांच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय 2009 (108-09) नुसार प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या दर्जाबाबत व आकारल्या जाणाऱ्या प्रवेश शुल्क व इतर शुल्काबाबत चौकशी करून तपासणी करण्याचे आदेश शिक्षण विभागातील तालुका पातळीवर गटशिक्षण अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. शाळांचा दर्जा तपासताना अ, ब, क, ड अशा श्रेणी देण्याचा निर्णय आहे; मात्र मनुष्य बळाअभावी ही तपासणी होत नसल्याने शाळांची मनमानी वाढली असल्याचे निदर्शनास येत आहे.
दरम्यान, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक व खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळाची शिक्षण विभागातील तज्ज्ञ अधिकाऱ्यांकडून तपासणी करा, अशी मागणी भाजप कायदा आघाडीच्या वतीने करण्यात आली असून गटशिक्षण अधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे. तालुक्यातील एसएससी बोर्ड, सीबीएससी बोर्ड, आयसीआयसी बोर्ड अथवा इतर कोणत्याही बोर्डाच्या शाळा असतील त्याची तपासणी केली जात नाही. अनेक शाळांमध्ये शिकवणारे विषय शिक्षक हे प्रशिक्षित नाहीत. तपासणी केलेल्या मात्र, त्यात त्रुटी असलेल्या शाळांवर कारवाई केली जात नाही. याबाबत शिक्षण विभागाकडून कोणतीच माहिती उपलब्ध होत नाही. याबरोबरच संस्थाचालक विद्यार्थी व पालाकांकडून अवास्तव प्रवेश फी, देणग्या घेत आहेत. त्यात पालकांची मोठी पिळवणूक केली जाते, याकडे तालुक्यातील शिक्षण विभागाचे दुर्लक्ष आहे. पालक विद्यार्थ्यांची पिळवणूक थांबविण्यासाठी शिक्षण विभागाने ठोस भूमिका घ्यावी, या मागणीचे निवेदन भाजप तालुका कायदा आघाडीच्या वतीने गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले, हे निवेदन शिक्षण विस्तार अधिकारी जीवन कोकणे यांनी स्वीकारले. यावेळी भाजप पुणे जिल्हा कायदा आघाडीचे अध्यक्ष ऍड. किरण झिंजुरके, खेड तालुका कायदा आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रदीप उमाप, माजी तालुका अध्यक्ष ऍड.चंद्रकांत सांडभोर, ऍड. संदीप रेटवडे, ऍड. दीपक चौधरी आदी उपस्थित होते.
तालुक्यात एकूण 557 शाळा
खेड तालुक्यात 402 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहेत, 4 आळंदी नगरपरिषदेच्या, 3 आश्रम शाळा अनुदानित असून एक आश्रम शाळा आदिवासी विकास खासगी अनुदानित आहे. दोन शाळा समाजकल्याण खासगी, अपंग कल्याणच्या आहेत. तालुक्यात 55 शाळा खासगी अनुदानित, 11 शाळा खासगी विनाअनुदानित आहेत. 75 खासगी विनाअनुदानित स्वयंअर्थसहाय्यता शाळा असून 4 खासगी अंशतः अनुदानित शाळा अशा 557 शाळा खेड तालुक्यात आहेत.
खेड तालुक्यात एकूण आठ विस्तार अधिकारी संख्या असताना केवळ 2 विस्तार अधिकारी कार्यरत आहेत. उर्वरित 6 विस्तार अधिकारी, 9 केंद्रप्रमुखांच्या जागा रिक्त आहेत, त्यामुळे तालुक्यातील शहराच्या जवळच्या शाळांची तपासणी करण्यात अडथळे येत आहेत. उपलब्ध अधिकाऱ्यांच्या माध्यमातून शाळांची तपासणी केली जात आहे. गटशिक्षण अधिकारी संजय नाईकरे यांच्या माध्यमातून समिती गठीत करून तालुक्यातील शाळांची तपासणी केली जाईल.
– जीवन कोकणे, शिक्षण विस्तार अधिकारी, खेड पंचायत समिती