नवी दिल्ली – देशभरात करोना प्रतिबंधक लसीचे लसीकरण मोहीम जोरात सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला वेग आला असून खासगी हॉस्पीटलमध्ये लस घेणाऱ्यांना लसीसाठी पैसे मोजावे लागणार असल्याचे केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे. तत्पूर्वी एम्सने देखील करोना लसीच्या दरासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे.
भारत बायोटेक आणि सीरमच्या लसी महागड्या असणार नाहीत. मला खात्री आहे की, प्रत्येक व्यक्ती ती लस घेऊ शकेल. यामुळे सर्व सामान्यांना आपल्या सवडीनुसार लस घेता येईल. तसेच लस घेण्यासाठी कुणालाही प्रतीक्षेत थांबावे लागणार नसल्याचे एम्सचे संचालक रणदीप गुलेरीया यांनी सांगितले.
दरम्यान लसीचे दर खासगी क्षेत्रासाठी अधिक नसणार, मात्र त्यामध्ये सिरींज आणि मनुष्यबळाचे अतिरिक्त दर लावण्यात येतील. ज्या प्रमाणे करोना चाचण्यांसाठी दर निश्चित करण्यात आले होते, त्याप्रमाणे लसीचे दर निश्चित करण्यात येईल. मात्र लसीचा गैरव्यवहार होणार नाही, याची काळजी घेण्यात येईल. शिवाय खासगी क्षेत्राला नुकसान होणार नाही, असंही गुलेरिया यांनी सांगितले.