कोल्हापूर – कोल्हापुरात आणखी एक कोरोना बाधित रुग्ण सापडला असून कोरोनाग्रस्तांची संख्या ३ वर गेली आहे. कसबा बावडा येथील ६३ वर्षीय महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात एकही नवा रुग्ण आढळला नव्हता मात्र आज नवा रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.
कोरोना बाधित महिला ही कसबा बावड्यातील मराठा कॉलनीतील आहे. या महिलेचा अहवाल सीपीआर प्रशासनाकडे प्राप्त झाला आहे. ही महिला काही दिवसांपूर्वीच साताऱ्याहून कोल्हापुरात आली असल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय. भक्तीपुजानगर नंतर कसबा बावड्यात कोरोनाचा रुग्ण आढळल्याने कोल्हापूरकरांत भीतीचे वातावरण आहे.
सीपीआर येथे उपचार घेणाऱ्या 63 वर्षीय महिलेचा कोरोनाबाबतचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला. जिल्ह्यतल्या कोरोना पॉझिटिव्ह संख्या 3 वर गेली आहे- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे
कसबा बावडा येथे राहणारी ही महिला 20 व 21 मार्च रोजी सातारा येथे गेली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी 22 ते 28 मार्च ती कोरेगाव तालुक्यातील बनवडे येथे गेली होती. 28 मार्च रोजी ती कोल्हापूरमध्ये परत आली होती. तीला सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे 30 मार्चला दिसून आली. दुसऱ्याच दिवशी 31 मार्चला खासगी रुग्णालयात तिने उपचार घेतला. 3 एप्रिल रोजी बावड्यातील सेवा रुग्णालयात तिच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सीपीआरमध्ये दाखल करुन तिचा स्वॅब घेण्यात आला. याचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला.
यादरम्यान तिच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेवून त्याबाबत पुढील खबरदारीचे उपाय म्हणून कार्यवाही सुरु आहे.