पुणे –मनपा मुख्यसभेत कॉंग्रेस नगरसेवकाच्या संबंधित संस्थेची महापालिकेची मिळकत काढून घेण्याच्या ठरावाला मदत करण्याचे आश्वासन कॉंग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने भाजप पदाधिकाऱ्याला दिले. याबाबतची कथित ऑडियो क्लिप व्हायरल झाल्याने कॉंग्रेसच्या शहर पदाधिकाऱ्यांसह राज्यातील नेत्यांनाही कोजागरीची रात्र जागून काढावी लागली.
या ऑडिओ क्लिपबाबत थेट प्रदेशाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेत्यांपर्यंत तक्रार गेल्याने पक्षांतर्गत कुरघोड्यांचे राजकारण चांगलेच तापले आहे. तर, या प्रकाराचे पडसाद बुधवारी झालेल्या मुख्यसभेत उमटल्याने संभाव्य वाद टाळण्यासाठी सभा तहकूब करण्यात आली. मात्र, या सभेत अनेक नगरसेवकांच्या प्रभागातील कामांचे प्रस्ताव होते. त्यामुळे अचानक ही सभा तहकूब करण्यात आल्याने नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली.
कॉंग्रेसच्या एका नगरसेवकाशी संबंधित संस्थेची जागा काढून घेण्याचा प्रस्ताव भाजप नगरसेवकाने दिला आहे. हा प्रस्ताव महिनाभरापूर्वी कॉंग्रेस आणि भाजप नेत्यांनी पुढे ढकलला होता. या दोन्ही नगरसेवकांमधील वाद मिटवून त्यावर तोडगा काढण्यासाठी हा प्रस्ताव पुढे ढकलण्यात आला होता. तोच बुधवारच्या मुख्यसभेत मान्यतेसाठी येणार होता. मात्र, त्यापूर्वी मंगळवारी रात्री “तुम्ही हा प्रस्ताव मंजूर करून घ्या. आम्ही त्यास नामधारी विरोध करू,’ असे कॉंग्रेसच्या एका ज्येष्ठ नगरसेवकाने भाजपच्या पदाधिकाऱ्याला मंगळवारी फोनवरून कळवले. त्यानंतर या फोनची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली.
सोमवारची सभा ठरणार वादळी
कॉंग्रेसमधील हा वाद समोर आल्यानंतर सत्ताधारी भाजपने कॉंग्रेस नगरसेवकाच्या विरोधातील प्रस्ताव मंजूर करण्याचे ठरवले होते. मात्र, त्यामुळे कॉंग्रेसमधील वाद आणखी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन सभा सुरू होताच; कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी पश्चिम बंगालमध्ये हिंदुंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ सभा तहकुबी मांडली. मात्र, त्यापूर्वी त्याचा विषय माहिती नसल्याने भाजपने आधी तहकुबी फेटाळण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, ऐनवेळी भाजपलाच अडचणीत आणणारी तहकुबी आल्याने भाजपलाही ती स्वीकारावी लागली. मात्र, आता या विषयावर सोमवारच्या मुख्यसभेत निर्णय होणार असून ही सभा वादळी ठरण्याची चिन्हे आहेत.