मुंबई : शिवसेना सरकारमध्ये किमान समान कार्यक्रमावर आधारीत पाठींबा देण्यासाठी राष्ट्रवादी आणि कॉंगेसने आपली समिती बुधवारी जाहीर केली. कॉंग्रेसच्या समितीत अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार यांचा समावेश आहे. तर राष्ट्रवादीच्या समितीत जयंत पाटील, अजित पवार छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि नबाव मलिक यांचा समावेश आहे.
शिवसेनला सरकारला पाठींबा देण्याबाबत किमान समान कार्यक्रमाचा मुद्दा कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी मंगळवारी उपस्थित केला. राज्य चालवण्याची भुमिका आणि धोरणे स्पष्ट होत नाहीत तोपर्यंत कॉंग्रेस पाठींब्याचे आश्वासन देऊ शकत नाही, असे पटेल यांनी स्पष्ट केले होते. किमान समान कार्यक्रमात, शेतकऱ्यांना कर्जमाफी, बेकारी भत्ता आणि नव्या उद्योगात स्थानिकांच्या नोकऱ्यांचे आरक्षित प्रमाण या जाहीरनाम्यात समाविष्ट केलेल्या मुद्यांबाबत कॉंग्रेस आग्रही आहे, असे सुत्रांनी सांगितले.
दरम्यान, सत्तास्थापनेबाबत, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि माणिकराव ठाकरे हे दुपारी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. सत्तास्थापनेचा दावा करताना बहुमत सिध्द करण्यास पुरेसा वेळ न देण्याच्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या निर्णयाला शिवसेना सर्वोच्च न्यायलयात आव्हान देणार नाही. त्याऐवजी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू कलरण्याच्या निर्णयाविरोधात न्यालयात दाद मागण्याचा विचार शिवसेना करत आहे, असे सूत्रांनी सांगितले.