कराड -कराड तालुक्यात वनवासमाची व मलकापूरनंतर करोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या म्हासोली गावातील आठ रुग्ण गुरुवारी करोनामुक्त झाले. त्यांना कृष्णा हॉस्पिटलमधून टाळ्यांच्या गजरात सोडण्यात आले. एकाच दिवशी आठ रुग्ण बरे झाल्याने म्हासोलीकरांना दिलासा मिळाला आहे. कराड तालुक्यात करोनामुक्तांची एकूण संख्या शंभर झाली आहे. त्यामध्ये विशेषत: कृष्णा हॉस्पिटलमधील रुग्णांची संख्या जास्त असल्याने हे हॉस्पिटल राज्यात आदर्शवत ठरले आहे.
कराड तालुक्यात वनवासमाची व मलकापूर येथील करोनाची साखळी आटोक्यात येत असतानाच म्हासोलीत दहा-बारा दिवसांपूर्वी नव्याने साखळी निर्माण झाली. त्यामुळे तालुका पुन्हा हादरला. करोनाबाधित रुग्ण झपाट्याने वाढू लागल्याने म्हासोली अल्पावधीत हॉटस्पॉट बनले. म्हासोली येथील पॉझिटिव्ह रुग्णाच्या निकट सहवासातील 50 वर्षांचा पुरुष, 18 वर्षांचा युवक, 16 व 17 वर्षे वयाची दोन मुले, 62 वर्षांचे वृद्ध गृहस्थ, 48 वर्षांची महिला, 45 वर्षांचा पुरुष व 35 वर्षांची महिला, अशा आठ रुग्णांना दि. 18 व दि. 19 रोजी कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या सर्वांच्या घशातील स्रावांची तपासणी केली असता, सर्वांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. त्यांच्यावर कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी यशस्वी उपचार केले. नर्सिंग स्टाफने घेतलेल्या विशेष काळजीमुळे आठही रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. त्यांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला.
यावेळी हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक ए. वाय. क्षीरसागर, कृष्णा अभिमत विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर, डॉ. संजय पाटील, डॉ. रोहिणी बाबर, डॉ. विनायक राजे, तुषार कदम, नुतेश पिसे, विमलाकांत बाबर, रमेश माने, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख उपस्थित होत्या. कृष्णा हॉस्पिटलमधून आतापर्यंत एकूण 68 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. कराड तालुक्यात करोनामुक्त झालेल्या शंभर रुग्णांपैकी बहुतेकांवर कृष्णा व सह्याद्री स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले आहेत. तालुक्यात बाधितांची संख्या वाढत असतानाच करोनामुक्तांची संख्याही अधिक असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.