- भोंदूबाबाला अटक; पिंपरीतील धक्कादायक घटना
पिंपरी – तुमच्या घरातील सर्व सदस्यांवर नात्यातील एका बाईने करणी केली आहे. त्यांच्या जिवातास धोका आहे. करनी उतविण्याच्या बहाण्याने भोंदूबाबाने पाच बहिणींवर लैंगिक अत्याचार केले. स्वतःचे लग्न झाले असतानाही त्यातील एका बहिणीशी लग्न केले. तरुणीच्या तक्रारीनंतर या भोंदूबाबाला पिंपरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हा धक्कादायक प्रकार 22 जानेवारी ते 21 फेब्रुवारी या कालावधीत पिंपरी येथे घडला आहे.
सोमनाथ कैलास चव्हाण (वय 32, रा. खैरेवाडी, ता. रोहा, जि. रायगड) असे अटक केलेल्या भोंदूबाबाचे नाव आहे. याप्रकरणी 22 वर्षीय महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोंदूबाबा सोमनाथ याने फिर्यादी महिलेच्या कुटुंबियांना सांगितले की, तुमच्या घरात पुत्रप्राप्ती होऊ नये, यासाठी नात्यातील एका बाईने घरातील प्रत्येक सदस्यावर करणी केली आहे. तुमच्या घरात सात पेट्या धन, एक सोन्याची घागर व एक गणपतीची मूर्ती असे गुप्तधन आहे. घरातील एका मुलीचा जीव धोक्यात आहे.
पुत्रप्राप्ती व्हावी, गुप्तधन मिळावे आणि मुलीचा जीव वाचवण्यासाठी घरात तीन उतारे व निर्वस्त्रपूजा करावी लागेल, असा उपाय भोंदूबाबाने सांगितला. तसेच या पूजेसाठी तीन लाख रुपये खर्च येईल व 11 हजार रुपये दक्षिणा द्यावी लागेल, असे सांगितले. तसेच हे तीन उतारे 15 दिवसात सुरू केले नाहीत तर कुटुंबातील सर्व व्यक्तींच्या जीवाला मोठा धोका असल्याची भीतीही दाखविली. अशा प्रकारे पाच बहिणींचे आर्थिक आणि लैंगिक शोषण केले. तसेच हा प्रकार कुणाला सांगितल्यास आई-वडिलांना काळ्या जादूने मारुन टाकण्याची धमकी दिली. फिर्यादीच्या एका बहिणीसोबत उतारा काढण्याच्या बहाण्याने तीन वेळा लैंगिक अत्याचार केला.
तसेच आरोपी भोंदूबाबाचे लग्न झालेले असतानाही त्याने फिर्यादी यांच्या एका बहिणीशी लग्न केले. पोलिसांनी भोंदूबाबाला अटक करुन भारतीय दंड विधान कलम 354, 354 (अ), 376, 376 (1) (ए), 376 (3), 376 (ए बी), 494, 496, पोक्सो, महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध घालण्याबाबत व त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबतच्या अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.