पुणे : ओळखपत्र नसलेल्या मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून रोजगारासाठी पुण्यात वास्तव्यास असलेल्या नागरिकांसाठी योगक्षेम प्रतिष्ठाण तसेच महापालिकेच्या वतीने करोना लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुमारे 150 नागरिकांना लस देण्यात आली. या शिवाय, संस्थेकडून या नागरिकांना लसीकरणानंतर एक ओळखपत्र तयार करून देण्यात आले असून या ओळखपत्रावर त्यांना 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाणार आहे. त्यासाठी या ओऴखपत्रावर प्रतिष्ठाणच्या सदस्यांचा तसेच संबधित व्यक्तिंचाही मोबाईल क्रमांक नमूद करण्यात आला आहे.
शहराच्या विविध भागात मोठया प्रमाणात कोणतेही ओळखपत्र नसलेले नागरिक आहे. त्यात, सोसायटयांचे सुरक्षा रक्षक, घरेलू कामगार, तसेच इतर काम करणाऱ्या नागरिकांचा समावेश आहे. हे नागरिक कामासाठी वारंवार बाहेर पडत असल्याने ते सुपर स्प्रेडर गटत येतात. त्यामुळे त्यांची नोंदणी करून त्यांचे लसीकरण करण्याची मागणी प्रतिष्ठाणने महापालिकेकडे केली होती. त्यानुसार, पालिका प्रशासनाकडून या नागरिकांसाठी विशेष शिबीर आयोजित केले होते. त्यात, सुमारे 150 जणांचे लसीकरण करण्यात आले. यात स्वारगेट, पुणे स्टेशन, विमाननगर, नगर रस्ता भागातील नागरिकांचा समावेश होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजेंद्र ( बाबू ) वागसकर आणि माजी नगरसेविका वनिता वागसकर यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते.
दुसऱ्या डोससाठी ओळखपत्र
या नागरिकांकडे ओळखपत्र नसल्याने 84 दिवसांनी दुसरा डोस घेण्यासाठी या नागरिकांना अडचण लक्षात घेऊन या नागरिकांना प्रतिष्ठाणकडून स्वतंत्र ओळखपत्र देण्यात आले. त्यात, या नागरिकांनी पहिला डोस किती तारखेला आणि कुठे घेतला आहे याचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच त्या नंतरही काही अडचण येऊ नये या उद्देशाने या ओळखपत्रावर प्रतिष्ठाणच्या सदस्यांचे मोबाईल नंबर देण्यात आले आहेत. त्यामुळे हे नागरिक कोणत्याही केंद्रावर जाऊन संबधित क्रमांकावर संपर्क करण्याची विनंती करतील त्यानुसार, प्रतिष्ठाणचे सदस्य संबधित नागरिकाची तसेच पहिला डोस घेतल्याची माहिती देऊन सदर व्यक्तीस दुसरा डोस मिळवून देणार असल्याचे वागसकर यांनी सांगितले.
———-