भुवनेश्वर – ओडिशात सुरक्षा रक्षकांबरोबर झालेल्या चकमकीमध्ये 4 माओवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. ओडिशातील कंधमाल जिल्ह्यातल्या घनदाट जंगलामध्ये रविवारी ही चकमक झाली
असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. या चकमकीत काही नक्षलवादी जखमीही झाले आहेत, असे पोलीस महासंचालक अभय यांनी सांगितले.
नक्षलवाद्यांबाबतची माहिती मिळाल्यानंतर विशेष कृती गट आणि जिल्हा स्वयंसेवी दलाच्या सदस्यांनी आज पहाटेच्या सुमारास कंधमाल जिल्ह्यातील तुमुदिबन्धा जंगलात छापा घातला, असेही या
अधिकाऱ्याने सांगितले.
सुरक्षा रक्षकांनी नक्षलवाद्यांच्या छुप्या अड्ड्यावर छापा घातल्यानंतर माओवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार करायला सुरुवात केली. त्यानंतर सुरू झालेल्या चकमकीदरम्यान चार नक्षलवादी मारले गेले.
याठिकाणी मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा आढळून आला आहे. हा सर्व स्फोटकांचा साठा जप्त करण्यात आला आहे, असे पोलीस महासंचालकांनी सांगितले.
ठार झालेले चारही माओवादी बंदी घातलेल्या सीपीआय (माओवादी) या संघटनेच्या बानासाधरा-नागावली-घुमुसार गटाचे सदस्य असल्याचा संशय आहे. यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर शोधमोहिम सुरू आहे. कंधमालचे पोलीस अधिक्षक प्रतीक सिंह हे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह घटनास्थळी रवाना झाले आहेत.
या आठवड्याच्या सुरूवातीला, कंधमालच्या फिरिंगिया भागात माओवाद्यांचा एक अड्डा उद्ध्वस्त करण्यात आला आणि मोठ्या प्रमाणावर स्फोटके जप्त करण्यात आली होती.