- सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर रंगाचा ‘स्प्रे’ मारून
- वाकड, चिंचवडमध्ये सराफाच्या दुकानात चोरी
पिंपरी – वाकड आणि रहाटणी येथे गेल्या आठवड्यात एकाच रात्री दोन ठिकाणी चोरट्यांनी डल्ला मारत 22 लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. त्यानंतर चिंचवड येथेही चोरट्यांनी डल्ला मारत सुमारे 20 लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना सोमवारी (दि. 20) सकाळी उघडकीस आली. याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, बिजलीनगर चिंचवड येथील गुरुद्वारा चौकात बालाजी ज्वेलर्स नावाचे सोने-चांदी विक्रीचे दुकान आहे. रविवारी रात्री दुकान बंद केल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. दुकानातून 10 तोळे सोने, 50 किलो चांदी आणि 66 हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. सकाळी दुकान उघडण्याच्या वेळी हा प्रकार उघडकीस आला आहे. दुकानदाराकडून नेमका आकडा न सांगितल्याने चोरीला गेलेला ऐवज कमी-जास्त होण्याची शक्यता आहे. चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर मारला रंगाचा स्प्रे
दुकानात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आपण कैद होणार हे माहीत असल्याने चोरांनी त्यावरही तोडगा शोधून काढला. चोरट्यांनी दुकानात शिरताच सर्वप्रथम सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर रंगाचा स्प्रे मारला. यामुळे कोणत्याही प्रकारचे चित्रीकरण होऊ शकले नाही आणि चोरट्यांनी निवांतपणे ऐवज लांबविला. सुरक्षिततेचे अनेक उपाय राबवूनही चोरट्यांकडून सराफा दुकानांना निशाना बनविले जात आहे. आता चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे रेकॉर्डिंगही वेगळी शक्कल लढवून बंद करत आहेत. गेल्या आठवड्यात चोरट्यांनी वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी करताना सीसीटीव्ही यंत्रणाच चोरुन नेले होते. यामुळे आता व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.