पाचटाच्या कोपीत राहून केला रात्र-दिवस अभ्यास : संगमेश्वर विद्यालयाने केला सत्कार
पारगाव शिंगवे – आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथील श्री. संगमेश्वर माध्यमिक व कै. बाबुराव गेणुजी ढोबळे उच्च माध्यमिक महाविद्यालयातील शंकर भगवान घोरपडे या ऊस तोडणी कामगाराच्या मुलाने पाचटाच्या कोपीत राहून दहावीच्या परिक्षेत 93.80 टक्के गुण मिळून प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
पारगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यात ऊस तोडणी मंजूर आपल्या मुलाबाळासह कारखाना स्थळावर राहतात. घोरपडे हे उसतोडणी करण्यासाठी पारगाव येथे आले. त्यांचा मुलगा शंकर घोरपडे याला शिक्षणाची आवड असल्याने त्याला संगमेश्वर माध्यमिक विद्यालय शिक्षणासाठी पाठविले. शंकरने आई-वडीलांना ऊस तोडणी कामात मदत करुन उसाच्या पाचट्याच्या कोपीत रात्र-दिवस अभ्यास करून 93.80 टक्के गुण मिळविले आहेत. त्यामुळे त्याचे सर्वत्र कौतूक होत आहे. संगमेश्वर विद्यालयाच्या वतीने स्कूल कमिटीचे अध्यक्ष शिवाजी ढोबळे यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी शांताराम ढोबळे, शिक्षक उपस्थित होते. तसेच भीमाशंकर कारखान्याच्या वतीने देखील त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कारखान्याचे सचिव रामनाथ हिंगे, ब्रिजेश लोहोट, कैलास गाढवे, रोहिदास भागवत आदी उपस्थित होते.