नीरा प्राथमिक शाळेच्या खोल्यांसाठी 33 लाख रुपयांच्या कामाला “तत्त्वत:’ मंजुरी
नीरा – नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होण्याची वेळ आली असतानाही वर्ग खोल्यांची व्यवस्था लावण्याकडे काणाडोळा करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या प्रशासनाला आज अखेर जाग आली.
पालक तसेच व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी आक्रमक होत नीरा (ता. पुरंदर) येथील प्राथमिक शाळेच्या इमारतीपुढे उपोषणाला सुरुवात केल्यानंतर जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत हा विषय घेत प्रशासनाने पॅराकोल पॅनलच्या तात्पुरत्या वर्गखोल्या उभारण्यासाठी 33 लाख रुपयांची तत्वतः मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात का होईना परंतु हा प्रश्न मिटण्याची चिन्हे आहे. मात्र, याबाबत प्रशासनाने ठोस भूमिका घेत इमारतीचे काम सुरु करण्याची पालकांनी आग्रही मागणी केली आहे. दरम्यान, विस्तार अधिकारी सुरेश लांघी यांनी उपोषणकर्त्यांना लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले. नीरा येथील शाळेची इमारत मोडकळीस आल्याने विद्यार्थ्यांना बसण्यास जागा नसल्याने आक्रमक झालेल्या पालकांनी 28 जानेवारीपासून मुलांना शाळेत पाठविणे बंद केले होते. त्यानंतर जि. प. प्रशासन खडबडून जागे झाले. 31 जानेवारीला प्राथमिकचे शिक्षणाधिकारी सुनील कुऱ्हाडे, पुरंदरचे गटविकास अधिकारी मिलिंद टोणपे, गटशिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे यांनी येथील शाळेची पाहणी करून तात्पुरत्या स्वरुपात मुलांची व मुलींची बैठक व्यवस्था येथील रयत संकुलात करण्यात आली होती.
दरम्यानच्या कालावधीत आचारसंहितेमुळे काम थांबले होते, परंतु, निधी उपलब्ध करून देऊन 1 जूनपूर्वी मॉडेल स्कूलच्या धर्तीवर शेड उभे केले असते, तर मंगळवारी (दि. 11) पालक, ग्रामस्थांवर उपोषणाला बसण्याची वेळ आली नसती. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष धर्मेंद्र येवले, राधा माने, राजेश काकडे, उपसरपंच बाळासाहेब भोसले, ग्रा. पं. सदस्य अनिल चव्हाण, अर्चना पवार, राहुल शिंदे, गणेश तातुस्कर, योगेंद्र माने, मंगेश ढमाळ यांच्या सह पालक व ग्रामस्थ उपोषणास बसले होते.
लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे
नीरा येथील पालकांनी व ग्रामस्थांनी जिल्हा परिषद, पंचायत समितीला साखळी उपोषणाचा इशारा दिल्यानंतर जि. प. शिक्षण विभागाने निधी मंजुरीकरिता मंगळवारी (दि. 11) स्थायी समितीपुढे विषय ठेवून निधी मंजूर करून घेऊन दि. 30 जूनपर्यंत मॉडेल स्कूलच्या धर्तीवर शेड उभे करून मुलांसाठी बैठक व्यवस्था करू, असे लेखी आश्वासन नीरा बीटचे केंद्र प्रमुख सुरेश लांघी यांनी प्रशासनाच्या वतीने देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केल्यानंतर अखेर पालकांनी व ग्रामस्थांनी उपोषण मागे घेतले.
आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये नीरा येथील मोड्यूल स्कूलच्या धर्तीवर पॅराकोल पॅनलच्या वर्ग खोल्या बांधण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी 33 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आता पुढील प्रक्रिया तातडीने राबवून वर्ग खोल्या उपलब्ध करून देण्यात येतील. तरी पालकांनी सहकार्य करावे.
– राजे लोंढे, गटशिक्षण अधिकारी