पुणे : शहरातील करोना नियंत्रणासाठी महापालिका अहोरात्र झटत असून प्रशासकीय पातळीवर युध्दपातळीवर काम सुरू आहे, या कामाची जबाबदारी सांभाळतानाच सामाजिक दायित्वाचे भान ठेवत महापालिकेचे परिमंडळ 4 चे उपायुक्त संदीप कदम यांनी मार्च महिन्याचे वेतन महापालिकेस आर्थिक मदत म्हणून दिले आहे. या मदतीचा धनादेश कदम यांनी नुकताच महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे दिला.
महापालिकेकडून करोना नियंत्रणासाठी आर्थिक जबाबदारी यशस्वीपणे पार पाडतानाच, ऑक्सिजन, बेडची सुविधा वाढविणे, औंषधे तसेच इतर मदतीसाठी शहरातील कंपन्या, सामाजिक संस्था तसेच नागरिकांकडून सीएसआर अंतर्गत मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. ही मदत वेगवेगळया पध्दतीने मिळत नसून गरजूंसाठी त्याचा वापर महापालिकेकडून केला जात आहे. याच आवाहनाला प्रतिसाद देत करोना नियंत्रणाची जबाबदारी सांभाळतानाच सामाजिक भान जपत उपायुक्त कदम यांनी मार्च महिन्याच्या वेतनाचे 75 हजार 767 रूपये महापालिकेस मदत म्हणून देत आदर्श घालून दिला आहे.
याबाबत बोलताना आयुक्त विक्रम कुमार म्हणाले की, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपायुक्त संदीप कदम यांच्या सारख्या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या व्यक्ती, संस्थेच्या वतीने सहकार्य मिळाल्याने प्रशासनास किंवा शासन यंत्रणेस निश्चितच एक प्रकारची उर्जा मिळाली आहे. तसेच आपले सहकार्य व पाठबळ भविष्यातही निश्चित मिळेल याची मला खात्री आहे सांगत, आयुक्त कुमार यांनी कदम यांचे अभिनंदन केले.