मुंबई – सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील टीका टीप्पणी जोरात सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांच्या अभिभाषणाला प्रत्युत्तर देताना विरोधकांवर हल्लाबोल केला होता. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री आणि भाजप खासदार नारायण राणे यांच्यावरही टीका केली होती. त्यात आज उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा राणे यांचं नाव घेता टीकास्त्र सोडलं. या टीकेला राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोकणातील लघू पाटबंधारे योजनांचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी राणे यांचं नाव न घेता मुख्यमंत्र्यांनी टीका केली. उद्धव ठाकरेंच्या या टीकेला राणे यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. राणे यांनी ट्विट करून म्हटलं की, मी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज हे स्वखर्चातून जनतेसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी काढले आहे, सरकारी पैशातून नाही. श्रीयुत उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्रात स्वखर्चाने एखादी बालवाडी तरी चालू करून दाखवावी, असं आव्हान राणे यांनी केलं.
मी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज हे स्वखर्चातून जनतेसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी काढलेले आहे, सरकारी पैशातून नाही. श्रीयुत उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्रात स्वखर्चाने एखादी बालवाडी तरी चालू करून दाखवावी. @CMOMaharashtra@OfficeofUThttps://t.co/SklDkFH0bz
— Narayan Rane (@MeNarayanRane) March 6, 2021
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणातील लघू पाटबंधारे योजनांचं ऑनलाईन उद्घाटन करताना म्हटलं की, मी कोणत्याही योजनांच्या केवळ घोषणा करणार नाही. ज्या गोष्टी करणं शक्य आहे त्याच घोषणा मी करेल. या योजना पूर्ण झाल्यानंतर मी स्वत: त्याचं उद्घाटन करण्यासाठी कोकणात येईल, असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिलं.