पुणे – शहरामध्ये नव्या नियमानुसार वाहनांची “पीयूसी’ अर्थात पोल्युशन अंडर कंट्रोल चाचणी ऑनलाइन करण्यात आले आहे. दि. 1 एप्रिलपासून संपूर्ण राज्यामध्ये याची अंमलबजावणी करण्यात आली. या नियमानुसार तीन महिन्यांनंतरही शहरामध्ये केवळ 18 ठिकाणी ही यंत्रणा सुरू झाली आहे. यामुळे ऑनलाइन “पीयूसी’बाबत आरटीओ प्रशासन उदासीन असल्याचे चित्र दिसून येते.
“पीयूसी’ तपासणी प्रक्रिया आजवर मॅन्युअली होती. मात्र, नव्या नियमानुसार ही यंत्रणा ऑनलाइन झाली असून तपासणी केलेल्या वाहनांचे छायाचित्रही अपलोड होणार आहे. इंटरनेट, कॅमेरा, ई-उपकरणांच्या सहाय्याने वाहनचालकांना “पीयूसी’ देण्यात येते. शहरातील वाहनसंख्या सुमारे 40 लाखांवर गेली असून यामध्ये जुन्या वाहनांचे प्रमाण अधिक आहे. परिणामी, या वाहनांच्या धुरामुळे होणारे प्रदूषण जास्त असून प्रदूषण पातळी नियंत्रणात आहे, की नाही यासाठी “पीयूसी’ तपासणी केली जाते. या चाचणीमुळे वाहनांतील कार्बन मोनॉक्साईड, हायड्रोकार्बनचे प्रमाण तपासले जाते.