मुंबई : राज्याच्या राजकारणात मोठा फेरबदल घडणार असल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे. कारण राज्यातील भाजपचा बडा नेता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. तर दुसरीकडे या नेत्याला पक्षात कोणते स्थान द्यायचे याविषयी चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी कार्यालयात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात बैठक सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.
उत्तर महाराष्ट्रातील नेता पक्षात घेण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीला गुलाबराव देवकर, आमदार अनिल भाईदास पाटील देखील उपस्थित आहेत. या नेत्याच्या प्रवेशाबाबत स्थानिक नेत्यांची काय भूमिका आहे, पक्षातील प्रमुख नेत्यांचे काय म्हणणे आहे, याबाबत या बैठकीत चर्चा सुरु आहे. उत्तर महाराष्ट्रातील मोठा नेता म्हणजे एकनाथ खडसे यांच्या नावाचीच सर्वाधिक चर्चा आहे. शिवाय एकनाथ खडसे मोठ्या काळापासून भाजपवर नाराज आहेत. त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे एकनाथ खडसेच तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर नाहीत ना अशा चर्चांना उधाण आले आहे. मात्र याविषयी अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.