नवी दिल्ली : दिल्लीमधील एम्स रुग्णालयामधील डॉक्टरला करोनाची लागण झाल्याचे नुकतेचसमोरआले होते मात्र आता त्याच्या गर्भवती पत्नीलाही करोना झाल्याचे तपासणीत समोर आले आहे. महिला नऊ महिन्यांची गर्भवती आहे. उपचारासाठी महिलेला एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून तिथेच तिची प्रसूती केली जाणार आहे. परंतु, या महिलेच्या प्रसुतीचे आव्हान डॉक्टरांसमोर असणार आहे.
महिलेची प्रसूती करताना आम्ही सर्व काळजी घेणार आहोत. सर्व प्रोटोकॉल डॉक्टरांकडून पाळले जातील. सुरक्षेसाठी डॉक्टर पीपीई म्हणजेच वैयक्तिक संरक्षक उपकरणे यांचा वापर करणार आहेत जेणेकरुन करोनाची लागण होण्याची भीती राहणार नाही, अशी माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.
याआधी महिलेचा पती जो हॉस्पिटलमधील फिजीओलॉजी विभागात डॉक्टर आहे त्याला करोनाची लागण झाली आहे. त्याला सध्या रुग्णालयामधील खासगी वॉर्डमध्ये हलवण्यात आले आहे. तसेच त्याच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाची तपासणी केली जात असून घरी क्वारंटाइन म्हणजेच विलगीकरणात राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
डॉक्टरच्या कुटुंबातील सदस्यांचीही तपासणी होत असून नमुने पाठवण्यात आले आहेत अशी माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. डॉक्टरने कुठेही परदेशात प्रवास केला नसल्या कारणाने त्याला करोनाची लागण नेमकी कशी झाली याची सध्या पाहणी केली जात आहे.