पुणे – शहरात करोनाच्या नव्या बाधित संख्येने दोन हजारांचा टप्पा गाठला आहे. मागील आठ दिवसांपासून बाधितांच्या वाढत्या संख्येने प्रशासनाची झोप उडवली आहे. सात दिवसांत (दि. 6 ते 13 सप्टेंबर) तब्बल 13 हजार 752 ने बाधितांची संख्या वाढली आहे. तर 281 जणांचा करोनामुळे मृत्यु झाला आहे.
शहरात मृत्युचा कहर सुरू असून, गेल्या 24 तासांत करोनामुळे 63 जणांचा मृत्युची नोंद झाली. त्यामध्ये पुणे शहर हद्दीतील 45 तर ग्रामीण आणि अन्य जिल्ह्यातील 18 जणांचा समावेश आहे.
शहरातील चाचण्यांची संख्या कमी-अधिक होत असली, तरीही रोज नव्या बाधितांची संख्या दोन हजारांच्या आसपास आहे. रविवारी (दि. 13) नव्याने 1 हजार 978 बाधित सापडले. त्यामुळे बाधितांची एकूण संख्या 1 लाख 19 हजार 567 वर पोहचली आहे.
त्यातील 99 हजार 76 बाधित करोनामुक्त झाले असून, दिवसभरात 1 हजार 587 बाधित बरे झाले आहेत. दिवसभरात 6 हजार 770 संशयिताची तपासणी करण्यात आली. तर आतापर्यंत तब्बल 5 लाख 34 हजार 645 जणांची तपासणी करण्यात आली आहे. शहरातील सक्रीय बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
गेल्या 24 तासांत जवळपास साडेतीनशे ते चारशेने सक्रीय बाधितांची संख्या वाढली असून, सध्या 17 हजार 788 बाधित सक्रिय आहेत. त्यातील 910 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यातील 440 बाधितांना व्हेंटिलेटर लावण्यात आला आहे, तर 470 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.