पिंपरी, दि. 6 (प्रतिनिधी) – करोनासारखी अत्यंत गंभीर परिस्थिती असतानाही अत्यावश्यक सेवेमध्ये कार्यरत असलेल्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझर, साबन यासारख्या गरजेच्या वस्तू न पुरविल्याप्रकरणी थेट राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे. ही तक्रार पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभाग तक्रार निवारण समितीचे उपाध्यक्ष ऍड. सागर चरण यांनी केली आहे.
शहरात करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या परिस्थितीतही अत्यावश्यक सेवेत मोडणारे आरोग्य विभागाचे हजारो कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत. या कर्मचाऱ्यांना सुरक्षा साधणे उपलब्ध करून देण्यात आली नाहीत. याबाबतचे वृत्त दैनिक प्रभातने सोमवारी (दि. 6) प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत ऍड. सागर चरण यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे तक्रार करत संबंधितांवर कठोर कारवाई करून कर्मचाऱ्यांना साधणे पुरवावित अशी मागणी केली आहे.
ऍड. चरण यांनी पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, करोनासारखी महामारीची परिस्थिती सध्या सर्वत्र निर्माण झाली आहे. या कालावधीतही आपला जीव धोक्यात घालून आरोग्य विभागाचे कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांना मास्क, साबन, सॅनिटायझर यासारखी साधणे तात्काळ उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. आपल्या परिवाराची चिंता न करता हे कर्मचारी सेवेसाठी काम करत आपले कर्तव्य निभावत आहेत. या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी सर्व सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्यात याव्यात.